मंदिरात गेलं की मनःशांती मिळते आणि आपली अडलेली कामदेखील पूर्ण होतात . मग माणसात पण अजून माणुसकी आहे , असं मी मानेल .
गाढ झोपेतून वर्षां वर्षे ... मंदिरातील काकड आरती , नमाजाची बांग त्यानंतर पहाटे आरवणारे कोंबडे मग त्यावर भुंकणारे कुत्रे ...ह्यांनीच झोप मोड करून उठवले आहे . कुत्र्यांना हाकलता येतं , कोंबडे खाऊन संपवता येतात पण अगदी त्या ' god particle ' ची शप्पत घेऊन सांगतो , घरा जवळील मंदिर , मस्जिदीतील होणाऱ्या आवाजा मुळे मात्र माझ्या शांत झोपेचं होणारं खोबरं ,रोज प्रसाद म्हणून वाटावं लागतं .
" आहे त्यात मी सुखी आहे , परिस्तिथी वाईट व्हायला नको म्हणून मी लढत आहे . सर्वांना सगळ्या साठी धन्यवाद " . अशी प्रार्थना मनात म्हंटली की बेदम पैसे कमवायला आपण मोकळे . अश्या प्रकारे देवाचं ना वेड ना वावडं . नास्तिकाच्या आडव्यात जात नाही आणि आस्तिकांना आडवण्यासारखं वाटत नाही .कारण आपण देवाला देव म्हणतच नाही ... " डॉन " म्हणतो !
देवाला जाणं म्हणजे येरवडा जेल मध्ये विख्यात ' डॉन ' कडे आपलं काम करून घेयला जाण्यासारखं वाटतं . " भाई जेल मधूनच सगळं कंट्रोल करतात " चित्रपटां मधील बऱ्याचदा ऐकलेला हा संवाद , देवाच्या बाबतीतही सारखाच वाटतो . फक्त देवाने कोणताच गुन्हा केलेला नसला तरी , तो देव आहे , तो काहीही करू शकतो (आपल्या फायद्याचं ) म्हणुनच ह्या एकाच कारणाने त्याला मंदिरात डांबून ठेवलंय .
भव्यदिव्य मंदिराच्या पार्किंग मध्ये पैसे देऊन 'दाबून' गाडी लावली की, मनापासून आपला विश्वास असणाऱ्या त्याच देवाच्या दारात‘ चपला चोरीला जातात ’ म्हणून अनवाणी चालायचं ... EDM च्या चालीवर वाजणाऱ्या प्रत्येक विक्रेत्याच्या दुकानातून वेग वेगळ्या वाजणाऱ्या भजनाच्या गोंगाटात हार , फूल , पेढे , नारळ इत्यादी 'डॉन'ला आवडणाऱ्या गोष्टींचा COMBO PACK ची घासाघिस करून खरेदी ... मग हे सगळं सांभाळायची कसरत करत दर्शनाच्या रांगेत , मग नंतर असं कळणं की ती रांग प्रसाधनाची असणे ... त्यानंतर ची प्रसादाची आहे मग तिसरी दर्शनाची !कुख्यात आरोपीला कसं जेल मध्ये देखील सगळं मिळतं , तसच काहीसं त्या देवाचं देखील आहे .
नवीन लग्न झालेली गुटर्गु- गुटर्गु करणारी जोडपी , थकलेले म्हातारे . माकडचाळे करून पालकांचा मार खाल्याने रडणारे पोरं . हे अश्या रांगा , ही अशी गर्दी ... घामाने भिजलेले चिकट स्पर्श करून जाणारे अंग ... गर्दीत मागून रेटा रेटी झाल्याने पुढे एक म्हातारा तोल जाऊन , सेल्फी काढणाऱ्या तरुणीवर , मग शिव-शिव म्हणावं अश्या शिव्यांचा नैवेद्य . मंदिराच्या पायऱ्यांवर भिकारी , त्यांचे देव आपण ...आपण मात्र आपल्या पेक्षा मोठ्या देवाच्या पायऱ्यांवर भिकाऱ्या सारखेच ... सर्वांचा देव मात्र ... हा विश्वनिर्माता ... एका मूर्तीत ... एका छोट्या गाभाऱ्यात ! 'डॉन' पेक्षा त्यांचे पंटर , चमचे , भिडू , भडवेच ज्यादा मजा करतात !
" पटकन दर्शन घडवतो " असं हळूच , ' झटकन तुमचा खिसा खाली करतो ' असं त्यांच्याच मनात T & C , प्रमाणे म्हणून , भक्तांना चिथवुन ब्लॅंक मध्ये दर्शन घडवणारे सौदेबाज चार वेळा दर्शनस्थळाच्या आत बाहेर करत असतात . दुपारी देवाच्या झोपे च्या वेळे आधी दर्शन झालं तर समक्ष ' आपले प्रश्न , मागण्या मांडता येतील ' नाहीतर मुखदर्शन करताना ' मागितलेला सगळं मिळतच असं नाही ' . कामाच्या लोडमुळे , लोकांच्या वाढत्या लफड्यां मुळे ...भविष्याच्या भीती मुळे ... पटा पटा सर्वांचे गार्हाणे ऐकून घेणे देवाला आता जमते म्हणे ... त्यामुळे कधी कधी दुपारची झोप होत नाही डॉन ची .
अश्या वेळी मधेच " गॉड पार्टीकल " डोक्यात येतो . सायन्स आणि गणिताच्या साहाय्याने त्याच्या प्रश्न , एखादा लहान निरागस मुलगा , त्याच्या तल्लख बुद्धीच्या मागे जाऊन सगळं समजून घेताना ... सोडवूनही टाकेल . पण आपले साधे साधे प्रश्न सोडवताना आपल्याला ह्या विश्व निर्मात्याची का मदत लागते कळत नाही ... असा विचार डोक्यात असतानाच ... गाभारा समोर येतो ... आपसूक हाथ जोडले जातात .
मोठ्या " डॉन " सारखाच तो देखील त्याच्या COMBO PACK स्वीकारणाऱ्या चमच्यां , झग्यां सोबत छोटाश्या देव्हाळात धूप आणि अगरबत्तीच्या धुरात आरामात बसून आपलं मोठेपण गाजवत , सगळं आतलं , बाहेरचं शांतपणे ' कंट्रोल ' करत असतो . भक्तांच्या पासून तो लांब अंतरावर राहूनच , लक्ष असेल तर नमस्कार चमत्कार स्वीकारतो . आत मध्ये त्यांच्या त्यांच्यात काही आलेल्या COMBO PACK चा हिशोब लागत नसेल तर ... मग मात्र तुमच्या गाऱ्हाण्या कडे त्याचं लक्ष असेलच असं नाही . तसं गल्लीतल्या मवाल्यां कडून रोज सकाळी होणाऱ्या त्रासा बाबत "डॉन" ला सांगणं म्हणजे जरा ... त्यांचा कमीपणाच ... मग काय दिली जरा यादी वाढवून मागण्यांची ... !
"ह्याच साठी का केला होता अट्टाहास" ... ते हेच दर्शन झालं . आपलं काम पूर्ण होईल की नाही ते आता " त्याच्या वर " अवलंबून आहे . पण शंका असेल तर एकदा त्याच्या बाहेरच्या एका चमच्याला तुमच्या कामाची आठवण करून दिली की तो तुम्हाला पळी भर 'तीर्थ' देतो , 'प्रसाद' देतो , कोड LANGUAGE मध्ये काहीतरी म्हणतो ..." तुमचं काम होऊन जाईल मी पाहतो ... ११ सोमवार तुमच्या नावाने कामाची आठवण डॉन ला करून देत राहील ". असा तोंडी करार दोघात होतो , 'चमचा' तुमचा पत्ता लिहून घेतो ... करार पक्का म्हणून "घ्या नारळ ... एवढी एवढी दक्षिण द्या ... डॉनच्या नावाने पण देणगी करा ... हफ्त्याच्या एन्ड ला ,तुमचं नाव परत समोर आलं की कामाची आठवण येईल त्यांना ... किती करता ? ... एवढेच ? अहो तुमचं काम किती मोठं ... येवढयाने काय होणार ? वाढवा वाढवा ... बस ओके . तुमचं काम झालच म्हणून समजा ... आता कोना दुसऱ्या चमच्या कडे जायच नाही ... डॉन ला आवडत नाही ते . " . पुढे जाऊन हेच चमचे स्वतःला 'डॉन' म्हणवून गाभाऱ्यात बसतात .
भक्तांनी कुठेही नारळ फोडल्याने , करवंटी चा तुकडा पायात शिरतो , अंगात अशक्त पणा , बाहेरचं पाणी पिल्याने मळमळ ... ' दाबून ' लावलेल्या गाडीचा डावा टेल लॅम्प कोणी तरी दाबून टाकलेला असतो . घरापर्यंत पोहचायला उशीर ... पण काही आठवड्यातच ... मेन काम फत्ते ... " डॉन पावला " ! घराजवळ मंदिर , मस्जिद च्या सोबत ... एक हॉस्पिटल आणि एक शाळा देखील आहे ... त्यामुळे आता माझी झोप ... सायलेंट झोन मध्ये येते !
" डॉन ची प्रचिती महान आहे , जागृत डॉन आहे , डॉन वर सिरीयल आलेली पाहिली नाही का ? डॉन वर सिनेमा येतोय म्हणे , नाही नाही नवस वैगरे नाही ... पेमेन्ट आधीच करावं लागतं , डॉन दमदार आहे , या एकदा जाऊन ... सगळी काम होतात . उगाच भविष्याची चिंता नाही काय ? ... " असं सर्वांना सांगत फिरल्याने ... डॉन फेमस होत राहतो ... तुमचा मात्र आत्मविश्वास , आत्मबल , स्वकर्तृत्व उरत नाही ... अगदी " गॉड पार्टीकल ची शप्पत ! "
डॉन पण काही दिसतो का सर्वांना ?
पण डॉन कुठेरी असतो ...
सगळेच त्याच्या शोधात आहेत ना ...
सापडला की एक ... जेल मध्ये जातो एक मंदिरात !
एक साक्षात्कार आणि एक सरेंडर ...
काय रे देवा ... काय रे डोन्या