Wednesday, 12 August 2020

गंध

प्रत्येकाच्या काही आवडी निवडी असतात, त्या आवडी निवडींना कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा ते 'हट्ट' होऊन बसतात. जी गोष्ट माणसाला एकत्र आणत असते ती गोष्ट प्रत्येकाला संसारा पासून पासून दुर नेत असतेच. त्यात सवयी आल्या, शौक आले, देव आले आणि दारुही आली. 


आपल्याला आपल्या घराला एक विशिष्ट गंध असतो तो पाहुण्यालाच जाणवतो आपल्याला जाणवत नाही. गंध चांगला असो किंवा वाईट पाहुण्याने त्या बाबत बोलायचे नसते.  त्याच प्रमाणे आपल्या घराला काही सवयी असतात, त्या आपल्याला दुसऱ्याच्या घरी गेल्यावरच जाणवतात... त्या मात्र बोलून दाखवायच्या असतात... पाहुणा म्हणून तो आपला हक्क असतो. 

ज्या घरात पाणी मागून घ्यावं लागतं  त्या घरातले एकतर खूप गप्पीस्ट असतात किंवा त्यांना आपलं येणं आवडलेलं नसतं...  

अनेकदा तर मी पाहुणा म्हणून त्यांना भेटायला नव्हे तर त्यांच्या घरी सिरीयल पाहायला आलोय असच त्यांचं मत असतं. एवढच काय काही काही घरात टीव्ही नसतो, ते पाहुण्यांना पळवायला त्यांना विचारलेले प्रश्न आणि आपल्याला येणारा घाम... जो खवचट नातेवाईकांना सामोरे जाऊ  शकतो तो जगातल्या प्रत्येक इंटरव्हिव्ह मध्ये पास होऊ शकतो. 


दुपारची वेळ आहे... जेवायला बोलावले आहे. 

"कुठून आणली मिठाई?  अमक्या कडून... अहो तुम्ही तमक्याची खाऊन तर पहा... तिच्यापुढे सगळे फिके." 

जेवायला बोलावणारा जेवण खाणाऱ्याला त्याच क्षणी याला परत कधीच बोलवायचे नाही हे मनोमन ठरवतो. आता दिलंय  ते खावं  ना, याच्या घरात साधा चहा लवकर मिळत नाही आणि मिठाई पण ब्रँडेड हवी. 


"तुमच्या घरी जेवायला बोलवाल तेव्हा त्या तिथूनच आणा बारीक मग मिठाई" 

"हो हो म्हणजे काय..."

जेवण खाणारा पण मनोमन यांना कधी जेवायला बोलवायचं नाही हे ठरवतो. आम्हाला द्या स्वस्तातले आणि आमच्या कडून महागाची मिठाई होय?


"अरे त्या त्या दुकानातूनच हे हे आणत जा, quality  मॅटर रे quality मॅटर..." असे मी माझ्या एका कॉलेजातल्या मित्राला सांगत होतो, पण तो मात्र हताश भावनेने म्हणाला त्यावर मी काहीच बोलू नाही शकलो. " ज्याच्या वाण्याकडे उधाऱ्या फुगत चालल्या असतात त्यांना शेजारच्या दुकानात कितीही चांगलं मिळत असलं  तरी नवीनच दुकान हुडकावे लागतात रे... तुम्हा श्रीमंताना नाही कळायचे ते". 


जिथे जिथे गरीब श्रीमंतांची दरी दिसत नसते तिथे दरी चा गंध असतोच. 

जिथे जिथे जातीवाद नाहीच असे वाटते तिथे तो गंध असतोच असतो. 

प्रत्येक जण एक सैनिक आहेच, फक्त कोणी वर वर आहे कोणी खोलवर आहे. असं मला वाटत. 


माझ्या लहानपणी आमचं मोठं घर शहराच्या उत्तरेत होतं पण माझ्या मॉम चे सगळे आवडते दालनं, कॅफेज, मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक हे शहराच्या दक्षिणेत म्हणजे दुसऱ्या टोकाला वास्तव्याला होते. त्यामुळे सणवार, गाठी भेटी, कसली खरेदी ठरली की आमची स्वारी दक्षिणे कडे कुच  करत असे. डॅड, मॉम आणि मी... शहराच्या त्याच रहदारीच्या रस्त्यावरुन दर वेळी वेगळी अनुभूती येत. कधी कोणाला आता सारखे सांगून भेटायला जाणे वैगरे नव्हते पण ठरवून केलेली  शॉपिंग झाली की मॉम च्या आवडत्या रेस्टॉरंट मध्येच डिनर आणि मग गाडीत खरेदीच्या पिशव्यांना टेकू देऊन बसायचे काम माझे. तेव्हा डॅड चा खाली झालेला खिसा आणि भरलेल्या गाडीत हसतमुखाने घराकडे जाणाऱ्या रस्त्यात सगळं काही साजरा करणारी मॉम आणि ते सगळं मनात साठवत जाणारा मी. 


सुट्टीचा दिवस असला की घरचे काम पटापट करून, दक्षिणे कडे आम्ही निघायचो. अनेकांनी आम्हाला इकडेच का नाही घर घेत हे सुचवलं पण बाबांना इथेच आवडत असे. यावेळी मात्र मॉम ने हट्टच धरला... 


आईला महिन्यातून एकदा तरी रात्री icecream खाण्याची तलफ येई, ती त्या वेळी डॅड  समोर ज्या प्रकारे हट्ट करत असे तेव्हा मी स्वतः लहान असून असे हट्ट कधीच करू शकलो नाही. डॅड  ने ज्या सहजतेने रात्री मोटार मधून आम्हाला शहराच्या दुसऱ्या टोकाला फक्त बायकोला तिथलं  icecream  आवडत म्हणून नेला. त्याच सहजतेने आम्ही दक्षिण दिशेला गजबजलेल्या तरी आलिशान असे एक घर घेऊन राहायला देखील आलो. 


खरंतर डॅड ना गर्दी गोंधळ, घरात गलबला नको असत  पण मॉम ला सगळं तेच हवं असे.  आता मॉम मला घेऊन हवं  ते, हवं  त्याच्याकडे जात असे. आता उत्तर दक्षिण प्रवासाचा वेळ बराच वाचत होता. त्यावेळी तिला घरी काय करावे कळत नसे. तेव्हा माझा अभ्यास झाला की आम्ही दोघे बराच वेळ गप्प मारत बसत असू... बाबा मात्र आता कामात बरेच रमलेले असत. ती या घरात खुश होती, म्हणजे तशी ती कायमच खुश असत. सगळं आता जवळ आलेलं बहुदा त्याचमुळे की मॉम जग सोडून खूपच लांब निघून गेली. 


तिचे आवडते शॉप्स, कॅफेज, हॉटेल्स आता मला आणि डॅड  ला पाहवत नव्हते. मॉम गेल्या गेल्या जवळच्या परिचित आणि मॉमच्या आवडत्या दुकानां  पेक्षा आता अपरिचित दुकानात जायला जास्त ओढा वाढला...कारण ओळखीच्या दुकानदाराच्या प्रश्नांना आत्ता उत्तर देयचे मला धाडस नव्हते.  

याउलट आता कॉलेजात आल्यावर मॉमची आठवण आली की भर पावसात सुद्धा त्याच icecream शॉप ला भेट द्यावी लागते कारण quality मॅटर आणि आठवणी देखील. 


काही दुकानां मध्ये उधारी वाढली तर काय करायचे ते जग शिकवते पण काही ठिकाणी तिथे असलेल्या आठवणींच्या गंधा चे काय करायचे हे लहानपणीच कळाले होते.  


  





गंध

प्रत्येकाच्या काही आवडी निवडी असतात, त्या आवडी निवडींना कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा ते 'हट्ट' होऊन बसतात. जी गोष्ट माणसाला एकत्र आ...