Monday, 30 March 2020

Rubik's cube.


शहरातल्या अश्या भागात छोट्या छोट्या गल्ली-बोळात जिथे काय काय चालतं हे सर्वांना माहीती असतं पण कोणीच त्या कडे लक्ष देत नाही अश्या भागात... फॉर्मल शूज घातलेला भास्कर भरभर चालत होता. मध्येच थांबून चुकलेला रस्ता, योग्य ती दिशा पकडून चालू लागत होता. तिथल्या रहिवाश्यांनी त्याला आधी पाहिलेलं असलं तरीही त्याच्याकडे कोणी आपुलकीने बघत नव्हतं... पत्र्यावर उड्या मारणारी वानरं, भरलेल्या टाकीतून पडणारे पाणी, हापश्यातून उपसले जाणारे पाणी,  जोरात वाजणारे बिहारी गाणी, त्यात मिश्रित झालेले मराठी होम मिनिस्टरचं टायटल साँग... सगळा आवाज एक झालेला. 

'एक बरंय आवाजाला जाती नाहीत, नाहीतर अवघड झालं असतं', असा मनातच विचार करून तो निघाला. तेवढ्यात स्पोर्ट्स शूज घातलेल्या ३-४ गुंडांनी त्याला गाठलं. त्यातील एकाने त्याला असा मागून धरला की भास्कर कुठेच जाऊ शकत नव्हता...

नाकातून बोलणारा आवाज आला "कुठे निघालास रे..." भास्कर हा आवाज काही पहिल्यांदा ऐकत नव्हता पण प्रथमच त्यानेदेखील नाकातून बोलत... "छमिया ने तुला पाठवलं? अरे अरे काय तुला काही स्टेटस आहे की नाही स्वतःचं?"  भास्कर ने त्याला असा प्रश्न विचारायचं कारण हे की तो गुंड बराच मुरब्बी होता. अनेक खून, दरोडे, हाफ मर्डर करून त्याने समाजात दहशत पसरवली होती. तो खूप कमी बोलायचा. 

इतर गुंडांना देखील तेच वाटलं की या white collar ला फक्त आणायला या पराक्रमी बाबूंना आपल्या सोबत का पाठवलं असेल पण भास्कर चालाख आहे, हे सर्व इतर गुंडांना माहिती होतं. 
"ए स्टेटस ! ते काय नाय... गप  भाडखाऊ." त्यांच्यातील एक जण भास्करवर खेकसला. 
" ए छमीयाच्या कुत्र्यांनो मला तिच्याकडे घेऊन चला , मी गल्ली विसरलोय. लोकांना पत्ता विचारणार होतो पण म्हटलं येतालच तुम्ही वास घेत न्यायला... बरोबर होतो मी." 

"ए हरामी... जीभ कसली चालतीये आज रे तुझी भडव्या... काय पिऊन आला काय तू? हां?..." एक गुंड वास घ्यायला येतो तर भास्कर त्याला पकडलेल्या गुंडावर " ए सोडे... काय पळून चाललो का?" ओरडून कॉलर नीट करत बाजूला उभा राहिला. 

"काय बघताय काय कुत्र्यांनो..." भास्कर परत त्यांना डिवचला. या मोहल्ल्यात या गुंडांनी असा अपमान पहिल्यांदाच अनुभवला असेल... आपण जर आत्ता याला धडा शिकवला नाही तर आपल्याला कोणी घाबरणार नाही अशी भीती प्रत्येक गुंडाला असते ती त्यांना देखील होती पण आत्ता काहीच करायचं नाही असे आदेश होते. भास्कर आणि गुंडांमधला तणाव वाढत होता पण... कळत नकळत अनेक नजरा आपल्यावर आहेत असं गुंडांना वाटतच होतं पण मोहल्ल्यातील लोकांना याचं फार काही घेणं देणं नसत. 

"चाय गरम चाय" म्हणत एक लुकडा बनियन घातलेला मुलगा येऊन... सर्वांना कडे पाहून "जो झगडे करणे बाजू मे करो. क्या साला लफडा... चाय गरम चाय" म्हणत तो गेला.  गुंडांनी त्याला एका थोबाडीत गार केला असता... पण काही हालचाली करण्या आत तो पुढे गेला. 

"चल ना बघताय काय? आधी तुम्ही छमिया चे कुत्रे तर होताच आता बघा माझे पण झालात" भास्कर आज कोणत्याच बाबतीत कच खात नव्हता. या उपर त्याने हाथ समोर छातीसमोर घेऊन... जीभ बाहेर काढून कुत्र्यासारखी नक्कल करून सर्वांची चेष्टा केली. तरीही गुंडांनी काहीच केलं नाही पण त्यांचा राग वाढत चालला होता. 'आपल्या अड्ड्यावर गेल्यावर याच्या कडे बघू ' असे इशारे करून ते निघाले. 


छमीया म्हणजे under world चं मोठं व्यक्तिमत्व. वयाने ३६-४० च्या आसपास, 'छ्मीया' फक्त तिला तिचा नवराच म्हणतो... तिचं व्यावसायिक नाव 'साहेबा' आणि खरं नाव अजून वेगळंच, पण आज भास्करने हद्दच केली होती. तिला तिच्या लाडाच्या नावाने अनेक वेळा पुकारून... तिच्या लोकांची नाराजी ओढवून घेतली होती. हेच तिच्या नवऱ्याला कळाले तर तो भास्करचा जीव देखील घेईल. 

तिच्यासमोर तिचे गुंड अंतरावर उभे होते. टेबलावर भरपूर पैसे आणि भरपूर बंदुका होत्या. अनेकदा या अंधारलेल्या घरात  बंदुका चालत तेव्हा छान सोनेरी प्रकाश पडत असे पण त्या नंतर होणारा आरडाओरडा तर्फडणारा प्रकार जीवघेणा असत. 

" दार उघड बये दार उघड..." भास्कर भसकन दारातून आत शिरला... तिने त्याच्याकडे पाहून न पाहिल्या सारखं केलं. कारण ती त्याच्याकडे पाठ करुन tik tok video बनवण्यात व्यस्त होती. भास्कर येऊन सरळ सोफ्यावर बसत म्हणाला, " क्या छमिया? आज तरी जलील चौखट पर कोई नहीं?" खोलीत उभ्या सर्वांना हा खवचटपणा आवडला नाही पण साहेबा म्हणतील तेव्हाच त्यांना हात उचलता आला असता. 

"साहेबा... हा भेटल्यापासून असाच वागतोय. तुम्ही म्हणत असाल तर त्याचे हात पाय तोडतो आत्ता लगेच." नाकातून बोलणाऱ्या पराक्रमी गुंडाचे बोलणे पूर्ण होऊ पर्यंतच, टेबलावर असलेल्या बंदुका पायाने सरकवत " ए चल हात पाय दाब माझे... आणि काय गं छमिया किती अंधार केलाय... खिडक्या उघडा.  तिनी सांजेची वेळ... दिवे लावा लक्ष्मी येते घरी. चहाचं बघ रे गोट्या..." त्यातल्या त्यात एका टकल्या भरदार गुंडाला तो उद्देशून म्हणाला. 

आता तर सगळे चेकाळलेच पण साहेबा काही बोलेनाच म्हणून सारे शांत होते. “अरे जा की चहाचं पहा... चायला" भास्कर आळस देत म्हणाला. टकल्या गुंडा ने दातओठ खाल्ले पण काही बोलू शकला नाही आणि चहा आणायला निघून गेला.  

अचानक साहेबाने त्याच्याकडे वळून पाहिलं आणि मोबाईल मध्येच डोळे जमवून... " गळ्यात पट्टा घालून नोकरी करणारा, तू आज इतका कसा माजला रे?   काय रे ज्यादा शाणा जाला तू? आज कोणाचा हात आला का तुझ्यावर? कुत्र्या?... काल पर्यंत मॅडम मॅडम अन् आज...? माझ्या शोहरला कळलं तर..." 

भास्कर देखील बसल्या बसल्या त्याच्या मोबाईल मध्ये पाहत होता आणि तिचं बोलणं होण्याआधीच एकदम म्हणाला " मस्त... व्हिडिओ मस्त... छमिया लिपस्टिक जरा कमी लावत जा गं... मी नोकरी सोडली हां आणि काय कश्या ठिकाणी राहतेस... इतकं कमावते? जरा चांगली जागा घ्यावी... बरं एक काम कर टीव्ही चालुये का?  न्युज लाव" हात डोक्यामागे नेत तो आरामात बसला... सगळे हा प्रकार काय चाललाय पहातच बसले. इतर वेळी कोणाची मिजास होती या घरात असे वागण्याची... पण अचानक हे असं काहीतरी घडत होत की कोणालाच काही कळत नव्हतं. 

साहेबाने टीव्ही चालू केला. बातम्या लावल्या तर त्यावर 
"एका अज्ञात इसमाने बिलाल अजमल सैदला भर रस्त्यात काही मिनिटांपूर्वी जीवे मारलं... बिलाल अजमल सैद हा under world चा मुखिया म्हणून प्रसिद्ध होता." भास्कर झटक्यात उठून तिच्या हातातून रिमोट घेऊन टीव्ही बंद करून परत जागेवर येऊन बसला. 

"मीच मारलंय... माझं काही बरं वाईट करायचं करून घ्या" साहेबाला काहीच ऐकू जात नव्हतं. ती थक्क होऊन जागेवरच कोसळली. तिचे गुंड ना तिला सावरायला धावू शकत होते ना त्या भास्करला हात लावू शकत होते. एकंदरीत सगळं काही मंदावलं गेलं. 

"चाय गरम... ओ साब. अभी तुमको टीव्हीपे देखा... तुमने खून किया... आजका चाय मेरी तरफ से... आजसे तुम हमारा नया भाई." चहावाला बनियन घातलेला तोच पोरगा आला आणि बरच काही निर्णायक बोलून गेला... आता नवं राज्य सुरू झालंय असा भाव भास्कर च्या चेहर्यावरील हास्यात दिसू लागलं.

"अये छमिया... माझ्यावर कोणाचा हात नाहीये... आता मीच हात आहे." असं बोलून त्याने बंदुका आणि पैश्याचे गठ्ठे खाली पाडले. तिथे एक घोट घेऊन चहाचा कप ठेवला... एक नेलकटर टाईप चाकू ठेवला, त्याला रक्त लागलेलं होतं आणि मग रुबी क्यूबकडे पाहून त्याला बिघडलेले रंग एकसारखे करून सोडवून टेबलावर ठेवलं. अजून एक चहाचा घोट घेऊन, मागे रेलून बसला. 
साहेबाने हंबरडा फोडला होता. गल्लीतले लोकं टीव्ही पाहून पाहून घरा कडे बघू, वळू लागली होती. 
खोलीतले सारे गुंड त्याच्याकडे बघतच राहिले... एवढसा किरकोळ माणूस आणि असा daring ने वागू शकत होता? अमानुष वागू शकत होता? 

तेवढ्यात एका बंदुकीच्या गोळीचा आवाज झाला 

टेबलावरील चाकू आणि रुबी क्यूब हादरलं...

.................................................


Wednesday, 25 March 2020

पांडा सारखं जगायची ती हिच वेळ.


खरतर...हा असा अनुभव तसा कोणालाच नाही ना... सर्वांसाठीच ही पहिली वेळ. त्यामुळे सदैव" आमच्या वेळी..." असं म्हणून काहीतरी सुरू करणारे देखील गप बसले आहेत. त्यामुळे ३० पर्यंतच्या मंडळींना सुख आहे. 

तसं आजच तसं काही फार जड, अवघड, परखड वैगरे नाही ... निव्वळ मनोरंजन पर आहे.
 कारण एकंदरीतच खूप वेळ मिळाल्या मुळे माझ्या वाढदिवसाचा एक फोटो मला समोर आला आणि मी चकाकलो... कारण त्या वाढदिवसाला मी काय मागणी घातलेली हे मला चांगलं आठवत होतं.
  
२०१७ च्या वाढदिवसाला... अर्थात पारंपरिक डार्क फॉरेस्ट केक वरील मेणबत्त्या फुंकून विजावताना, तुम्हाला वाटेल की मी storya सोडतो पण... मला कधी तरी पांडा सारखं जगू दे असं निसर्गाकडे मागणी केली होती. मला पांडा मनापासून खूप आवडतो... भ्रमणध्वनी च्या पडद्यावर चित्रफितीत आणि छाायाचित्रात पहिला तेवढंच. तरीदेखील मांजर आणि कुत्रा या टोकाच्या पाळीव प्राण्यां पेक्षा... पांडा उत्तम वाटतो. तसं पाळीव प्राणी दुसऱ्या कडेच चांगलं वाटतं या मताचा देखील मी आहेच. 

तर खायचं... लोळायच... पडायचं... मस्त राहायचं आणि परत रिपीट करायचं. 
काय बाकी धर्म नाही व्यवहार नाही वाजले किती ची चिंता नाही उच नीच असा काहीच नाही... भूक, आळस आणि घरात राहायचं बास. 
नात्यातील कोणाचा त्रास नाही. 


सोप्पं म्हणजे मांजर, सिंह, वाघ या प्राण्यांचे जास्त तास झोपेचे रेकॉर्ड मोडा... तुमच्या कडे सिंह किंवा वाघ नसावा पण मांजर/बोका असल्यास तिच्या/ त्याच्या म्याऊवादाला आव्हान देऊन बिनधास्त झोपा... आणि सावकाश उठून त्यांच्याच स्टाईल ने आळस देऊन उठा. 



हत्ती सारखं खाव, उंटा सारखं पाणी प्यावं, माकडां प्रमाणे इतरांच्या डोक्यातल्या ऊवा काढत बसाव्या...
आपण zoo मध्ये आहोत असं समजून हवं ते करावं, पण रानटी व्हावं का?  यावर मी माणूस असल्यामुळे विचारच करत बसलोय... असो 


आज नवीन काय केलं हा प्रश्न आपल्याला कोणी विचारी नये अश्या प्रकारे आपण शक्यतो जगायचा प्रयत्न करावा...पण विचारलाच प्रश्न तर ते म्हणजे... 
वाचलं? हो वाचलं.
 काहीतरी बघितलं? हो बघितलं...
पण त्याही पेक्षा...काल रात्री ११ च्या आसपास झोपून... आज सकाळी ९ ला उठून १२ ला आंघोळ करून मराठी नववर्षनिमित्त ने (लिंबाची ढाळ न आणता) परत दुपारी ३ तास झोपायची ही हातोटी मला प्रथमच माझ्यात सापडली. 
डोळ्या खालील डार्क सर्कल घालवुयात... 
नवे स्वप्न पाहुयात म्हणून भरपूर झोपुयात.
अरे जमलं की...
Panda is my Spirit animal... घातलेल्या लोकांना हे दिवस नुसती चंगळ. मी तर तो शर्ट की टी शर्ट घेयचे देखील कष्ट घेत नाहीये.

घराच्या बाहेर तर सोडाच... बेडरूम पण सोडायचे कष्ट मी घेत नाही. तरीही कोणी काही बोलत नाही. आता यात काहीतरी negative टाकून... एक लेखक म्हणून कसा पठ्ठ्याने लिखाणाला ट्विस्ट दिला अशी शाब्बासकी सध्या उपयोगाची नाही. 

तरी सर्वांनी या गोष्टीचा म्हणजे आरामाचा लाभ घ्यावा... 
स्वतःचे मन सकारात्मक ठेवा... ते जमत नसेल तर तरीही झोपा... मला तरी असं वाटतं झोपल की काहीच negative नसतं त्यामुळे positive च असतं की सगळं.

मी पांडा प्राणी समर्थक...

जय जुमांजी





Friday, 20 March 2020

घरटी...

"हॅलो... साहेब... काही नाही... झालं का जेवण? आमचं नाही झालं.  ते धंदा पूर्ण बंद हाय... थोडे पैसे पाठवले असते तर बरं झालं असतं. धन्यवाद साहेब... हाच नंबर आहे. हातावर पोट आहे... धंदा चालू झाला की परत करेल मी साहेब. साहेब गुड नाईट.” एका झोपडपट्टीच्या तोंडाशी राहणाऱ्या आणि दाबेली विकणाऱ्या सुरपंत ने खोलीतल्या बायको आणि ३ पोरांचं पोट भरायचे नियोजन केले. 
मोबाईल वर मेसेज आला. पैसे आलेले... त्याने लगेच पिवशी घेतली, पायात चपला लटकवल्या आणि तडक निघाला. चालीत उगाच एक वेग होता पण हालचालीत मात्र तितकासा आत्मविश्वास न्हवता.

दुकानात जाऊन त्याने माफक राशन मागितलं... शेजारीच एक गृहस्थ कॉल वर बोलत होते. “हा baby... अजून काय हवं, कोक... घेतला, मशरूम... घेतला, ऑलिव ऑइल घेतलं, ब्रेड, एग्ज, चीज, बटर सगळं घेतलं.   काय? आज? वूड इट बी सेफ?... ठीके मी मेडिकल मध्ये जातो... इथून अजून काही हवंय?... ओके!  तू माहोल बनव, आज ते आपण last year घेतलेले ग्लास काढ आणि तुझ्या फ्रेंड. ने दिलेली तुझी आवडती वाईन. Aww आलोच मिस यू टू...” कायम देशो देशी सरहद्दी सहज ओलांडणारा यशवंत... आज वेगळंच आयुष्य जगत होता. त्याने जवळपास १००० च बिल सहज चुकतं करून, मेडिकल ची वाट धरली. 

मेडिकल मध्ये बऱ्यापैकी गर्दी होती... एक जण कानाला मोबाईल लावून, तोंडाला मास्क असलेला इसम चांगलाच जोर जोरात रडत होता. दुसऱ्या थरथरत्या हातात एक चिठ्ठी होती... बहुदा त्याच्या कडे पैसे असावेत पण डॉक्टर ने रुग्णाचा निकाल आधीच दिलेला असावा आणि शेवटचे प्रयत्न म्हणून हा ते लिहिलेली औषध घेयला आला असावा. 
खजील मनाने यशवंत  ने हवं होतं ते मिळवलं... घाई घाईत खिश्यात टाकावं तर नेमकं ते खाली पडलं. त्याच्याच शेजारी मास्क लावलेली एक महिला होती... ती बराच वेळ सनितीझर मिळवण्याची धडपड करत होती. तिने ते पाहून न पहिल्या सारखं केलं.  यशवंत शरमेने पळालाच...

" अहो मॅडम किती sanitizer नेताय तुम्ही... सकाळपासून ५ वी वेळ असेल तुमची... तुम्ही दुसऱ्या दुकानात जा बर आता.” मेडिकल वाला तिच्यावर खेकसला... कारण मास्क लावलेलं असलं तरी त्याने तिला ओळखलं होत. “ तुम्ही मला शिकवू नका... मला sanitizer हवंय म्हणजे हवंय. पैसे देते की मी... मला Ocd आहे मी तुम्हाला डॉक्टर च लेटर पण दाखवलं आहे." पण तिच्या वादा चां काहीच फायदा झाला नाही. ती त्या गर्दी तून मागे येऊन एका ठिकाणी बसली... “माय भूक लागली माय... आज खरंच २ दिवस झाले हाय काह नाह खाल्लं... पैसे नको खायला दे माय... सगळे मंदिर बंद दर्घे बंद... कोण दान धरम करेना माय...” तिच्या कडे एक भिकारी खरोखर काकुळतीने अन्न मागत होता ती त्याला काहीतरी घेऊन देणारच तेव्हढ्यात पोलीस व्हॅन सायरन वाजवत आली... “ काम झाले असेल तर निघा... गर्दी करू नका. ए भिकर्या चल निघ... ओ मॅडम झालं ना काम?  चला निघा..." भिकारी गेला आणि ती मॅडम पण गेली. 

पोलीस पुढे चालू लागले  "लोकांना कसली जबाबदारीच नाही वाटत. सध्या परिस्थिती काय, अपंनकर्तोय काय आणि च्यायला या चायना च्या... मादर्चोत साले. सगळं जग ढवळून काढलय... कधी नव्हे ते चायला सुट्टी मिळालेली, तिकीट बुक होते... जायचं होतं फिरायला दुबई ला... सगळं फिस्कटल. बायको कधी नव्हे ते चांगली वागत होती. बोंबल्ल सगळं. ए त्याच्या कडे घे रे... पिलाय वाटतं हा. काय रे... पिलाऐस का? जा की घरी... कुठून अलायेस? चल निघ हरामखोर... परत दारू पियुन दिसू नको. चल रे चालू दे गाडी... काय चायला एका चित्रपटात एक डायलॉग होता... साला दारू नही पिया तो स्पिरीट कैसे आयेगा शहर मे?... हा बघ कुठे चालला घाईत... जाऊदे जाऊदे... डॉक्टर होता वाटतं." 

“आईला कसला मोकळा रोड आहे.  पोलीस अशी मधून जायची... मध्येच ऊभ राहायची कधी सवय सोडणार काय माहित. आता कोणाचा कॉल आला?  'हॅलो बेटा... मी चाललो आता हॉस्पिटलला , डोन्ट वरी... आय विल बी फाईन... तिकडे काय परिस्थिती?... ग्रेट. आईला कॉल करा... चल. टेक केअर. बाय.' आज तर जोरदार काम असणार आहे. लेट्स सी... डॉकटरांना वर्क फ्रॉम होम नाही." 

डॉक्टर च्या समोरून कोणा मंत्र्याची गाडी गेली... म्हणजे तसा ताफाच होता. " साहेब... ओ साहेब... वहिनी साहेबांचा कॉल आहे. काय सांगू?". " दे मी बोलतो... हॅलो... हो जेवण झालय हो ठीके ठीके... हो चालतंय. काळजी नको. तुम्ही काळजी घ्या... हा चला ठेवतो." 
" पी ए... आपल्याला मास्क घ्या... तुमच्या वहिनी साहेब बोलल्या... तुम्ही पण मास्क लावा, टीव्ही वर पाहतेय मी तुम्हाला आणि का हो? तुमचा छोकरा येणार होता ना?" 
"भारतात आलाय... क्वरांटाईन झालय. तशी काही काळजी नाही पण जरा ताप न खोकला होता." 
" तुम्ही मला हे आत्ता सांगताय?   काही अडचण आली तर सांगा..." 
"हो साहेब धन्यवाद." 
" ड्रायव्हर अरे रस्ता मोकळा असला तरी... सावकाश चालवा. मेला असता ना तो." 

सुरपंत ने त्या मंत्र्याच्या अंगावर आलेल्या गाडीला चांगल्याच शिव्या घातल्या... तो तसाच तावा तावात घरी पोहचला. बायकोला अन्न शिजवायला सांगत... पोरां कडे वळाला. ते खिडकीच्या माळ्यावर एका चीमिनीच्या घरट्या कडे पाहत होते.  चिमणीने देखील या अचानपणे झालेल्या बदला मूळे घरट्यातच राहणे पसंत केले होते. 

Tuesday, 17 March 2020

घर एक प्राणिसंग्रहालय...



"घरा चां पार प्राणी संग्रहालय झालय"... विश्वनाथ कोणाला तरी कॉल वर सांगत होते. मागून ५ वर्षीय सारा... भरपूर झालेला पसारा आता तिच्या भावावर नेमबाजी ची प्रॅक्टिस म्हणून फेकत होती. तिने नेमबाजीत जाऊ नये. तिचा भाऊ वरद तिचा चुकलेला नेम एकदम बरोबर आहे, असे वाटायला bat घेऊन मारत होता. म्हणजे घरात जमिनी पेक्षा हवेत अनेक गोष्टी जागा बदलत होत्या. 

"आमच्या हिने तर पोथ्या चां वाचून वाचून चोथा केलाय... बर एखादीला इतक्या वेळात पाठ तरी झालं असतं पण नाहीच." विश्वनाथ अजूनही कोणालातरी कॉल वर प्रसंगाचे वर्णन करत होते. सारा आणि वरद च्या धिंगण्यावर त्यांची आई ओरडत होते. त्यांच्यावर कोणी ओरडल की आमची रॉकी भुंकत सुटते... 

तेवढ्यात बेल वाजली. सारा आणि वरद ची आई दारा कडे टॉवेल, पाणी, साबण घेऊनच धावली. श्रीकांत आला... भरपूर स्वच्छ झाल्यावर त्याला आत घेतला... मग त्याने आणलेल्या सर्व वस्तूंना फवारला... बॅग, बेल्ट, वॉलेट, अंडी,ब्रेड आणि लॅपटॉप वर फवारणी झाली. मग तो तिला  तुला कशी अक्कल नाही सांगत होता आणि ती त्याला तुला कसं काहीच कळतं नाही हे सांगत होता. 

“झालं यांचं चालू...” विश्वनाथ ची कॉमेन्ट्री चालूच होती. 
तेव्हढ्यात श्रीकांत चा दुसरा भाऊ एक नवी कोरी भयावह कविता घेऊन आला... रॉकी देखील त्याला टाळू लागला. कवी मुलाची मुलगी मध्येच सेल्फी काढत होती, कोणाशी तरी व्हिडिओ कॉल करत होती, तिचा भाऊ pub g खेळत होता... आतून कवी ची बायको आली आणि त्याला भरपूर काहीबाही असमंजस बोलून घेऊन गेली... तिचं नाव नेमकं कादंबरी आहे... ती काय बोलते तिलाच माहीत. 

सगळ्याची कमीच होती तर त्यावर टीव्ही एकपात्री प्रयोग करत होता... त्याच्याकडे पाहून कोणी काही प्रतिसाद देईल की नाही याचं त्याला घेणं देणं न्हवत. घोकून घोकून पाठ करायला लावलेले भाषण जसा पहिली दुसरीत ला पोरगा श्वास न घेता बोलत सुटतो तसलच काहीसं होतं. 

कादंबरी ची बहिण शेजारच्या खोलीत होती. तिने स्वतःच्या  हाताचे, पायाचे नखं... मग बहिणीचे, मग सारा, वरद, श्रीकांत चे हाता पायाचे नख रंगवले. पोथी वाचणाऱ्या आजीने देखील पाय पुढे केले. मग हाथ पुढे केले. विश्वनाथ पण कॉल वर बोलता बोलता... नखं रंगवून घेतले. कवी काका कडे ती गेली नाही आणि रॉकी तिच्या कडे शांतपणे थांबली नाही... आता ती स्वतःचे डोक्याचे केस रंगवत आहे, आता याचा प्रयोग कोणावर होईल याची चिंता सर्वांना आहे. 

"मी तर तसाही कुठे बाहेर पडत नाही... आता तर कुठे जायची सोयच नाही." विश्वनाथ मोबाईल ला चार्जर लावून बोलू लागले. 
कवी काका चा एक तिशी आसपास चा मुलगा आहे. तो स्वयंपाकघरात काय बनवत असतो कळत नाही पण त्याच्या विष प्रयोग सर्वांवर होतो. सतत किचन मध्ये तो कोरोना ची लस बनवत आहे असे विश्वनाथ कॉल बर सर्वांना सांगत आहेत. 

सगळ्यांची चाव चाव वाढत चालली होती म्हणून "चल मी ठेवतो." असे विश्वनाथ बोलले आणि कॉल ठेवता ठेवता असे काय जोरात शींकले की सगळे स्तब्ध झाले. सर्वांच्या माना त्यांच्याकडे वळल्या... सर्वांनी रुमाल, मास्क लावून घेतले. रॉकी तर अतल्या खोलीत पळूनच गेली. 

विश्वनाथ शरमले... सगळे शांत राहिले. 

फक्त टीव्ही ची अखंड बडबड चालूच होती. 


Friday, 13 March 2020

कोडीच्या...



रुबिक्क्युब सारख्या गोष्टीचं कोड सोडण्यात आपण किती रमतो. जीवाचा आटापिटा करून सगळे रंग एक बाजूला अनाण्यासाठी झटत असतो. वेळ लागतो, डोकं चालणं बंद होतं. तेव्हढ्यात कोणी एक जण आपल्याला हिणवत ते हातातून घेऊन वाकड तिकडं करून ते कोड सोडवून देतो. 
आपण त्या कोड्या कडे बघत राहतो. सोडवलं गेलेलं प्रत्येक कोड आपल्याकडे बघत कुष्चीत हसत आहे असं वाटतं, आपण ही त्याकडे पाहून हसावं. 

शब्दकोडी सोडविणारा म्हातारा हमखास बस मध्येच सापडतो कारण आयुष्याची कोडी सोडवलेला माणूस शक्यतो सगळं सोडून निवांत घरी बसलेला असतो किंवा रिटायर झाला तरी अतिरिक्त कामे घेऊन विमानाने प्रवास करत असतो... विमानातून प्रवास करणाऱ्या मंडळींच्या चेहर्यावरील भाव मात्र कोणत्याही कोड्यां पेक्षा कमी नसतात. हा प्रवासी हवाई सुंदरी कडून पाणी मागणार नाही असे वाटत असेल तर तो पाणीच काय, सर्वात महागडा व बेचव जिन्नस घेतो आणि आपल्याला ऑफर न करता रीचवतो. त्याहून गम्मत म्हणजे अशी की शब्द कोडी सोडवू शकणारा बस मधील प्रवासी त्याच्या इतका मोठा, सुंदर शब्दकोश असून देखील... कोणाशीच बोलत नाही आणि एखादी अडाणी म्हातारी एकदा का बोलायला चालू झाली की थांबत नाही. 

फेसबुक मध्ये युट्यूब च्या झालेल्या अतिक्रमणाने भरपूर प्रमाणात अंगठ्याच्या वाटेत व्हिडिओ येतात... त्यातच एक मस्त कलंदर, कुलूप आणि चावी च्या कोडी सोडवण्यात धन्यता मानतो. जगातून कुठून कुठून हे असे काहीतरी कड्या कुलूप गोळा करून, मिळवून, विकत घेऊन... ती कोडी सोडवून जगाला दाखवतो. काही मिनटात तो ती कोडी सोडवितो आणि ती महागडी वस्तू निरुपयोगी करून टाकतो. त्याच्या  घरात लहान मुलांना मस्त करमत असेल . 


सुडोकू नावाचा एक खेळ असतो... जवळपास खेळच म्हंटला तरी चालेल. अजूनही शब्दकोडी प्रमाणेच अनेक लोकं हे आकड्यांचे खेळ रंगवताना दिसतात. अनेक मध्यम महागड्या हॉटेल्स मध्ये आपण ऑर्डर केलेली डिश आपल्या समोर येऊ पर्यंत हा विरंगुळा पुरवला जातो पण गम्मत म्हणजे आपल्या कडे पेन असला तरच आपण त्या भानगडीत पडतो. 

शाळेत असताना आपल्याला रसायनशास्त्र इतका विस्तृत करून सांगतात की त्याची डोक्यात कोंडी होते. Chemestry शिकायची असेल तर science बेस असलेली कोडी नक्की सोडवावी. Practical करण्यापेक्षा हा भाग खूप सोप्पा आणि आळस प्रिय लोकांना सुख आहे. 
त्या नंतर येतात mpsc upsc मध्ये विचारले जाणारे प्रश्न जे खरोखर कधी विचारले जातात की नाही हे पाहायला आपल्याला बरच काही दावा वर लावावं लागतं. जो upsc आणि mpsc करणाऱ्या मंडळींना कोणी त्रास दिला की ते असली कोडी त्यांना फेकून मरतात. 

Facebook आणि whats app वर येणारी कोडी तर भलतीच भारी असतात. ईमोजी वरून नावे, गावे आणि चित्रपटाची गाणी ओळखावी लागतात. काही कोडी आपल्याला सोडवता आली नाही तर जग जाहीर हार मानावी लागते त्याचसोबत अजून काही बाकी शोधून त्यांना त्यात गण्डवावं लागत.

सर्वात मजेशीर कोडी म्हणजे ग्रहांची. भारतीय मंडळींना जन्मपत्रिका, कुंडली हे कागदपत्र काही नवीन नाहीत. लांब राहून जवळीक साधायचे प्रमाण नातेवाईकांनी या ग्रहांकडून शिकलेले असावे. या ग्रहांची कोडी सोडवतो एक जण आणि निभवतो एक जण. सोडविणारा आणि निभावणार या दोघांना एकमेकांना कसं काहीच कळत नाही... हेच दाखवायचं असतं. कुंडली मधील चौकोन की काय असतं ते... त्यात काहीच नसून कुठून त्यांना ग्रह दिसतात काही कळत नाही. असो! 

अनेकदा आपण गुंता आणि कोडी यात गफलत करतो. कालांतराने गुंता सोडवण्यात आपण माहिर होतो आणि चटक लागून आपणच गुंता करून त्याला सोडवण्यात धन्यता मानतो पण कोडी तशी नसतात... ज्याला हे समजले त्याने आयुष्याचे अर्धे गुंते आणि कोडी संपवलीच समजा.

शब्द, अकडे, चित्र, रंग, माणसं सगळेच अडकतात आपल्याला त्यांना सोडवायला जायलाच हवं ना? 

गंध

प्रत्येकाच्या काही आवडी निवडी असतात, त्या आवडी निवडींना कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा ते 'हट्ट' होऊन बसतात. जी गोष्ट माणसाला एकत्र आ...