प्रसिद्धीखोर
ज्यास नाही स्व सिद्धी
त्यास हवी कायम प्रसिद्धी
नेट पॅक स्वस्त झाला आणि सारेच जाणकार झाले.
गल्लीत मुके आणि फेसबुक वर बोके... असे मिरवू लागले.
कर्माने काहीही असले तरी सारे लिहिते झाले. कालांतराने कर्माने काहीही असले तरी ते अभिनेते, चित्रकार, व्यंगचित्रकार, नर्तक, पत्रकार आणि कट्टर कार्यकर्ता होऊ लागले. राजकीय पक्षच काय, आपला धर्म, आपलं ऑफिस, आपली शाळा आणि आपला छंद हाच इतरां पेक्षा श्रेष्ठ कसा हे मांडू लागले. त्यावर भांडू लागले. एका लेखका प्रमाणेच त्यांच्या या कलेला कोण पैसा देणार हे एक दिव्यच होतं. आपण मत मांडता मांडता कधी भांडायला लागलो... हे कळलं नाही पण फुकट व्यक्त व्हायला मिळालंय ना? मग ओढा की प्रसिद्धी.
' आपण कायम चर्चेत राहावं ' ची चटक सर्वांना लागली. त्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या आल्या... पण आपल्या बोलण्याने समाजात बदनामीचे देखील पडसाद पडणार याची कोणालाच जाणीव नव्हती. ज्याला यश, अपयश, कौतुक आणि बदनामी पचवता येते ती पचन क्रिया खरी. प्रसिद्धी मिळाल्यावर तुम्ही हजारोंचा एक चेहेरा बनता तेव्हा तुमचा खरा चेहेरा न लपवता जगण्याची हिंमत नसेल तर... सोशल मीडिया आणि वर्तमानपत्राचे उंबरठे सतत झिजवावे लागतात कारण तुम्हाला जे लोकांसमोर आणायचे नसते ते आपोआप येत राहते मग ते लपवायला हे छाप, ते छापायला हे लपव... असे मृगजळ जगणे सुरू होते.
या बिनबुडाच्या प्रसिद्धीखोर मंडळींनी राजकारणी लोकांना दैवत मानावे... ते त्यांनी घातलेले पांढरे कपडे आणि त्यांच चारित्र्य किती हुकुमतीने जपतात. रोज टिकांची रंगपंचमी आणि घोटाळे उघड झाले तर होणारे वस्त्रहरण... यातून ते सहज बाहेर पडतात. या सगळ्यात मात्र कार्यकर्ते ऑन स्क्रीन भांडत बसतात. हे भांडण कधी कधी ऑफ लाईन ऑन ग्राउंड देखील रूपांतरित होतं. प्रसिद्धीखोर इथेही सेल्फी काढायला जाऊन मोबाईल थोबाडावर पडून घेतात.
Freedom of expression सोबतच आता tension of separation हे घटनात्मक व अपघातमक वाक्य... अनेकांची झोप मोड ही आपण ' एक सत्य ' मांडलं की 'आपली' किती लोकं दुखावली जातील याचे गणित अजुनही लागत नसल्यामुळे उडाली आहे... त्यामुळे प्रश्न मंडण्या पेक्षा सणां च्या शुभेच्छा देण सोप्प. कारण १३० करोड मधून कोणाच्या भावना कुठे दुखतील सांगता येत नाही... आणि त्या दुखीला औषध कुठंय? टीका, समिक्षा तर दूरच पण साधी सरळ वळणाची comment देखील अनेकांना निरुत्तर करते. त्यामुळे पुरोगामी, प्रतिगामी आणि सध्याच्या इंस्टाग्रामी जगात... ' देश मरो अपना पेट भरो ' हे सर्वांनीच स्विकारले आहे. त्यामुळे सत्य घडामोडींना बगल देऊन आपणच आपले गुलाम होऊन राहिलो आहोत... यात प्रसिद्धीखोर अग्रेसर आहेत.
करोडो लोक रोज कश्या कश्यातून व्यक्त होतात पण सत्य मांडायची भूक कोणाला नाहीये. एखादा भुकेला असला तरी त्याला कोणी भीक घालत नाही. परिस्थिती अशी आहे की खरं बोलणाऱ्याला ना कोणी मदतीचा हाथ देतय ना आधाराचा खांदा. तरी हाच व्यक्ती गेल्यावर डोक्यावर उचलायला सारेच सरसावतात कारण मेल्यावर प्रत्येक माणूस चांगलाच असतो.
सतत सोशल मीडियावर फोटो टाकने, मत मांडत राहणे प्रतिष्ठेचे ठरत असले तरी... ऑफ स्क्रीन कोण कसा आहे हे जगाला माहीत असतेच. गोड गोड बोलून सर्वांच्या आयुष्यात Trending राहिले की तुम्ही temperory सेलिब्रिटी होता... पण कधी तरी एकदा तरी सत्य मांडून पहा.
कलाकारांना प्रकाश झोतात राहणे ठीक, आपल्या कलाकृतीला प्रसिद्धी मिळणे ठीक पण उगाच अंधारात उदबत्ती घेऊन अंधारलेल्या इतिहासातच उजेड पाडून स्वार्थ साधत राहणाऱ्या प्रसिद्धीखोर व्यक्तींना विचारावं वाटतं
' तुमचं नेमकं दुखणं काय? '
- दुर्गेश विवेक निसळ