'लाल शाईने टीचर ने केलेला शेरा लहानपणी किती टोचायचा आणि आता बघ तर...कॅलेंडर मध्ये लाल शाईतल्या तारखा खूप सुखद धक्का देऊन जातात'.
तेव्हाच आतुरतेने वाट पाहिल्या जाणाऱ्या लाल सिग्नल चा रेड सिग्नल म्हणून रंगांतर झाला आणि इशारा मिळताच गर्दी हल्ली आणि विचारांच्या ट्रेनने रुळ बदलले.
'चार वेळा केलंय मेलीने... काम आपण करायचं आणि बॉस पुढे नाव यांचं... नकोच वाटतिये ही नोकरी मायचा टन्ना' “ए बावळट... असं कुठे मध्येच थांबतो, ओ काढा की तिकडून... जाऊद्या". ' लहानपणा पासून चायला... काम आम्ही करायची, कौतुक मात्र दुसऱ्यांना... आई बापाला नाही जमलं... समाजा कडून काय अपेक्षा ठेवावी?'
“अरे चल की बाबा.... मुक्काम करतो का आता?"...' कौतुक तर त्या अत्याच्या मुलाचं आहे राव, सबमरिन मध्ये काम करतो, महिना महिना खोल पाण्यात... तिथे रेंज असते की नाही विचारायचं राहीलच, घुसमटत असेल पण नक्कीच इतक्या खाली, बॉस वाईट वागला तरी दोघं समोरच असतील, त्याच्या मुलाच्या बारशाला जायचच आहे म्हणा तेव्हा विचारूच. कोणाचा कॉल आला आता?'... “हॅलो हा... येस सर... ठीके ठीके..."
'वाटलं... मस्त आता घरी जाऊन आराम करावा,. लावलच काम मागे.' अजून एक सिग्नल लागला. सगळं स्थिर... अस्थिर होण्यासाठी, पुढे जाण्यासाठी... परत घरट्यात स्थिर होण्यासाठी. लालचा सिग्नल हिरवा झाला...
कॉल आला. ‘चायला बरोबर सिग्नल ग्रीन झाला कीच कॉल येतो’. “हॅलो बोल बेटा... येतेच आहे मी. दादाने मारलं तुला? अगं मग तू पण मार त्याला... रडायचं काय त्यात. मी सांगते हा त्याला अशी मारा मारी करायची नाही म्हणून. बाबा आले? बर बर येतील येतील... ठेवू मी?”... ‘जुळे झाले आणि आयुष्याचं एक वेगळाच अध्याय चालू झालय... शाळेत २ चां पाढा शिकले आणि आता संसारात आई झाल्यावर उपयोगी आलं... तरी हिरपा सोबत लग्न झालं असतं तर वेगळीच मजा आली असती, हॉमोग पण काही वाईट नाही... पण मिश्री वापरतो यार!'
”हॅलो... बोल ग... कसकाय आठवण मैत्रिणीची? जाऊयात की... एकच तर व्यसन हो मैत्रीण आपलं... उडूवू पैसे भरू कपाटं... चीचो ची तब्येत बरीये, आत्ताच भावाने wwf खेळून झालय भईनी सोबत, भेटुयात मग... ऑफिस च काय चालूच आहे... काम करो क्रेडिट की अपेक्षा मत राखो... तुझं काय? सासू कोणाकडे आहे सध्या... घेऊन जा म्हणा, जाऊदे.... भेटू आपण, हे काय पोहोचलेच आहे. चल ठेवू का? बाय.”
‘बिचारी... आयुष्यात इतके दुखः आहेत तरी खुश आहे. आता पोळ्या करायच्या, नाही आधी ईमेल करायचं... जाऊदे पोळ्याच करू. काम काम तरी किती करायचं? आता या लिफ्ट का काय झालं?' “हॅलो... अहो आपल्या वॉचमेन ला कॉल करता का?... लिफ.. काही नाही काही नाही झालं झालं... लवकर या. वाट पाहतेय... असच, काय लाडात बोलू नाही शकत का? Awww... आले मोठे. या लवकर... हे काय बेलच वाजवतेय ह्म्म... ये रे लवकर... बाय"
.................