पु.
जखम भरली जखम भरली असे वाटताच मस्त अंघोळ केली जाते आणि तिथेच घोळ होतो. जखमेचा भाग टम्म फुगतो आणि त्यावर वजन पडल्यास ठणकतो. बलुतं वाचताना असच वाटलं.जिवंत वस्त्या, कसबे, खेडी, गावं यांचे लचके शहरांनी गिधाड होऊन मोडले. रोजगार मिळवण्यासाठी ओसंडून चाललेली शहरे एका बाजूला तर गावांत निर्माण झालेली निर्मनुष्यता, आहेत तेव्हड्या माणसां मध्ये असलेले हेवे दावे, दारिद्रय, अशिक्षितपणा, अविश्वास...आणि पाणी नसलेली शेतं, अंगाला आलेला घाम व माळरानावरचं मोकळं वारं. या सगळ्या मध्ये जखमा आहेत, जखमा भरत आल्या असल्या तरी, अविचारी माणसात विकृतींचा 'पु' व्हायला वेळ लागत नाही. शेतकरी, गरीबी, शिक्षण, गरजा, भूक, वासना, व्यसन याविषयी ४० वर्षां आधी दया पवार यांनी लिहून ठेवले आहे आणि अजूनही ते लागू आहे. बलुतं हे आत्मकथन आहे, पण असे काही लिहिले गेले आहे की मी त्याला 'अत्माकथन' म्हणेन. माणसानेच माणसाला केलेल्या जखमा माणूसच माणुसकीने ठीक करू शकतो, असे मलम कळत न कळत तुम्हाला, मला, आपल्याला असलेल्या जखमांवर हे पुस्तक लाऊन जाते. हिंदी, जर्मन, फ्रेंच, इटालियन... या चार भाषेत हा मराठी 'पुस्तकपट' अनुवादित झाला आहे.
..............................................................................................................
चि.
खोली, हा बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या मंडळींसाठी हृदयात खूप खोलवर जाऊन बसलेला विषय असतो. अश्या भाडेतत्वावर राहण्यार्या मुला मुलींना या साखर लावलेल्या जमान्यात पेयिंग गेस्ट असे आता म्हंटले जाते, म्हणजे आधी व्यवहार आणि नंतर नाते असो. खोलीला बायको प्रमाणे जपावे लागते आणि खोली मालकाला सासर्या प्रमाणे. एका खोलीत आधीच आपण दोन असताना अजून दोन गरुजू मित्र 'एडजेस्ट' करायचे आणि कधीतरी रात्री टांगा पलटी होऊन आल्यावर दुसर्या दिवशी किंवा त्याच रात्री मालका कडून "खोली खाली करा" असे अजूनही ऐकू येते. विद्यार्थ्यांना अभ्यास, नोकरी, स्थैर्य, प्रेम, लग्न स्वताचे घर असे प्रश्न काही कमी असतात का? तरीही असा काहीतरी वैय्यादपणा त्यांना कायम करावा वाटतो. काहीही असले तरी पुण्यातील हा खोलीचा मुद्दा, खोली मालकाचा खवचट पणा, खोलीत राहणारी गावरान इरसाल पोर... यांचा 'जबरदस्त विनोदी टायमिंग' असलेला हा चित्रपट खरोखर ३० वर्षांपूर्वी बनवला गेलाय, असे जरा कमीच वाटते. अगदी ३-४ वर्षा पूर्वी मी देखील बालगंधर्व समोरून असाच, खोलीच्या शोधात चाललो होतो, असे अनुभव अनेकांना आहेत. माझ्यावरच ही कथा लिहिली आहे आणि नंतर मनोरंजनासाठी काल्पनिक गोष्टी त्यात ओतल्या आहेत असे... पुण्यात शिकणाऱ्या अनेक मुला मुलींना अचानक डोक्यावरून छप्पर गायब झाल्यावर वाटते. आता फेबु ग्रुप्स आहेत, साईट्स आहेत, एजेंट आहेत... पण अशीही बनवा बनवी... कायम राहणार आहे.
........................................................................................
मा.
बलुतं आणि अशी ही बनवा बनवी या नंतर हॉलीवूडच्या फ्रेंड्स या विषयी थोडे लिहावे वाटते. आधीही मी याविषयी ब्लॉगवर नुकतेच लिहिले आहे. न्यू-योर्क शहर, त्यात असलेले मध्य विशीतले ६ अतरंगी मित्र, ३ मुली आणि ३ मुलं. दर दिड ते दोन वाक्या नंतर प्रेक्षकांना हसवण्याचे सामर्थ्य असणारे संवाद, २४ वर्षां आधी लिहिले गेले आहेत असे मला तरी वाटत नाही. माझे मित्र असेच आहेत. माझा मोठा भाऊ असाच आहे. माझी बहीण देखील अशीच वागते. मी असाच आहे. कायम असेच वाटायला लावणारी ही मालिका आहे. देश बदलला म्हणून विशेष काही बदलते असे मला वाटत नाही. संस्कृती बदलते म्हणून समस्या बदलत नाहीत, फक्त त्या कडे पाहण्याचा स्वभावसंस्कार वेगळा असतो. बलुतं मध्ये प्रेम झाल्यास लपवून ते ठेवणे हे भाग आहे. अशीही बनवा बनवी मध्ये प्रेमासाठी काहीपण तर फ्रेंड्स मध्ये प्रेम म्हणजे... नदीतून पाईपात, मग हौदात, मग टाकीत, मग नळात, मग पोटात, मग संडासात आणि मग परत नदीत. असा हा प्रवास मैत्री, प्रेम, स्वमग्नता आणि वासना याविषयी विनोदी शैलीने साकारले आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
ता.क-
तीन तीग्डा काम तगडा, असा मी डोळस आहे.
हे तीन, म्हणजे पुस्तक, चित्रपट आणि मालिका मला विलक्षण वास्तवादी, विनोदी व विषारी वाटतात. सप्टेंबर २०१८ म्हणजे या तिघांचा 'वाढमहिना', बलुतं ४०, अशीही बनवा बनवी ३० तर फ्रेंड्स २४ वर्षांचे झाले आहेत. या अजरामर कलाकृतींना साकारणाऱ्या कलावंतांना , स्वीकारणाऱ्या प्रेक्षकांना आणि यातीन्ही दृस्तीकोनांचा आस्वादचं न घेतलेल्या अश्यांना देखील सुभेच्छा.
बलुतं हे दुखात वाहून नेणारे वारे आहे, जिथे शेवटी सुखच सापडते.
अशी ही बनवा बनवी हे परिस्थितीच्या विरोधात जायला शिकवणारा आहे.
फ्रेंड्स मात्र एक असे वारे आहे की मैत्री घट्ट असली की परिस्थितीने कितीही वादळे आणले तरी टकून राहणारी आहे.
पु- पुस्तक
चि- चित्रपट
मा- मालिका
..............................................................................................