Thursday, 24 May 2018

भोवरा

मन आहे न मन भोवऱ्या सारखे असते, ते जिथे जिथे जाते फक्त ते ते मी कागदावर उतरवतो.

'मला वाचायलाच वेळ मिळत नाही रे (pause)... तुझ्या कडे कोणते पुस्तक असतील तर दे न वाचायला'.
हे वाक्य मी अनेकदा ऐकले आहे पण ते जाणवले मात्र 'मला गाडी चालवायची सवय नाहीये पण तुझी गाडी मी नीट चालवेल दे' असे आहे.
दुसर्याच्या गोष्टी, वस्तू आणि आयुष्य वापरायचे म्हणल्यावर ज्या लोकांमध्ये विलक्षण आत्मविश्वास येतो ते लोक स्वताच्या बाबतीत मात्र बघू काहीतरी, करू काहीतरी, आण काहीतरी, खाऊ काहीतरी हे असे उदास सूर लावतात. 'काहीतरी' हा एक असा शब्द आहे, तो न वस्तू आहे, ना गोष्ट, ना ध्येय, ना कोणते स्पष्ट उत्तर तरीही किती बोलका आहे. नेहेमीच हा 'काहीतरी' भविष्याच्या अंधारात बिनधास्त पणे चक्कर मारून येतो. असा आत्मविश्वास सध्याच्या शहाण्या लोकां मध्ये तुम्हाला दिसून येणार नाही, हा गुण वेगळ्य (वेड्या) लोकांचाच आहे.

असे वेगळे लोक, चहा मध्ये चहा पत्ती टाकायला विसरतील पण सोशल मिडीयावर स्टोरी टाकायला ते विसरणार नाही, तुमच्या परिघात असे वेगळे लोक तुम्हाला सापडतीलच, बहुदा आत्ता तुमच्या चेहेर्या समोर अश्यांचा चेहरा देखील आला असेल. असे मंडळी कायम त्यांच्याच दुनियेत रमलेले असतात, अश्यांना पाहून हसू आल्या शिवाय राहवत नाही. मान खाली घालून असलेले अचानक statue of liberty सारखा एक हाथ वर करतात आणि सेल्फी काढतात, पुढार्यांनी चौका चौकात फ्लेक्स लावावे तसे प्रत्येक सोसिअल मिडीयावर स्टोर्या लावतात. याच मुळे आताश्या चहा पिणे या गोष्टीला काही वेगळेच महात्म्य मिळत आहे आणि ते अजून वाढतच चालले आहे. त्यामुळे लवकरच घरा मध्ये चहा आता चाळणीतुन गाळला जाऊन गहू मात्र गाळणीतून चाळले जाण्याची शक्यता आहे आणि तंदूर चहा वैगरे गोष्टीमुळे मातीच्या चुली कडे कल जाऊ शकतो, हरकत नसावी फक्त काही दिवसांनी तंदुरी बटर रोटी सारखे तंदुरी बटर चहा वैगरे सारखं काही चालू होऊ नये.

त्याच बरोबर माणसाचा अतिशय होतकरू दोस्त म्हणजे कुत्रा, याचा वेगळाच थाट दिसून येत आहे. घरातल्या पाळीव कुत्र्याला होणारा जावई आवडला नाही म्हणून लग्न मोडल्याचे ऐकिवात आहे. एखाद्या समोर अखंड बोलत राहणे आणि समोरच्याने काय बोललेच तर त्या कडे दुर्लक्ष करणे या महिलांच्या स्वभावा मुळे नवरोबांची जागा या बाबतीत कुत्रा या पाळीव प्राण्याने घेतली आहे असे म्हणतात. बाकी कुत्रा हा घरातल्या माणसा पेक्षा किती हुशार आहे हे दाखवण्याची धडपड मला खूप हसवते. कारण इथे त्या कुत्र्याच्या मालकाने स्वताला बावळट ठरवून कुत्र्याच्या शेपटीच्या हालचालीवर नाचायचे ठरविले असते. अश्या वेळी एक अदृश्य पट्टा कुत्र्यानेच मालकाच्या गळ्यात घातलाय की काय असा भास मला होतो. बाकी कंपनी मध्ये गळ्यात id लटकावून राब राब राबणारे तो भास खरा ठरवतात हा भाग वेगळा.


माणूस कितीही विद्वान असो तरी त्याने कन्डक्टर, ड्रायवर आणि रिक्षावाला याच्या नादी लागु नये. प्रवाश्याने केलेल्या प्रत्येक प्रश्नांना किमान शब्दात उत्तर देऊन त्यात थोडी अतिरेक माहिती मिसळून अक्कल शिकवणे यात त्यांची जीभ कोणीच धरू शकत नाही. कोणत्याही गोष्टीला इथे मीटर आहे पण पान वाल्याकडे अशी थेरं नाही, पानाला चुना लावावा तसा तो प्रत्येक गोष्टीला पाल्हाळ लावत लावत चघळून चोथा केल्या शिवाय थुंकत नाही. इथे शालीनता, स्वच्छता असा कसलाच मुलैजा नाही. तरी पानाला आग लावून पान खाऊ घालणारे पान वाले या सोशल मिडीयाच्या कोपर्या कोपर्या वर नजरेत येतात.

आधी हाहा म्हणता असं बोलल जात, आता मिमी म्हणता मिम तयार होऊ लागले. मिम देखील दुग्धजण्य पदार्था सारखे असतात एका दिवसा पेक्षा ज्यास्ती टिकू शकतील की नाही हे सांगता येत नाही. ताप, सर्दी, खोकला याही पेक्षा हे मिम हे वायरल होत आहेत. राहुल गांधी तर या बाबतीत viral किंग म्हणायला हवा. खरतर मी मिम बनवतो या पेक्षा तुला मिम बनवायला वेळ आहे या वरच लोक खूप हसतात. पण काही सांगता येत नाही माणूस खूप प्रगतीशील प्राणी आहे तो बहुदा हसवण्यासाठी एखादे app देखील बनवेल, ज्याने आपल्याला हवे तेव्हा स्वतालाच गुदगुल्या केल्या सारखे जाणवू लागेल. मी तर म्हणतो एक वेळ अशी येईल की यंत्र मानव जन्माला येईल आणि मनुष्य निर्माण होईल.

आपण काहीतरी नियोजन करावे आणि नशिबाने त्यावर ख्याक करून हसावे, हा stand up कॉमेडी चा कार्यक्रम सगळेच करत असतात, काहींना पैसे देऊन,हसून  दाद देणारे प्रेक्षक मिळतात तर काहींना आपली आपली म्हणत होतो असेच लोक सोडून जातात.आजकाल inspiring video पाहिल्यावर स्वतावर हसू येते आणि कॉमेडी शो पाहिल्यावर आपल्याला स्पुरण चढते. आपले दुख हे कायम दुसर्या साठी हसण्याचे कारण असू शकते हे तुम्हाला मला सर्वांना माहित होते पण काहींनी त्याचे भांडवल करून पैसे कमावले तर कुठे चुकले? प्रत्येक गोष्टी मध्ये देव असतो की नाही मला माहित नाही पण नक्कीच आपल्याला हसवण्याची एखादी स्टोरी त्यात नक्कीच लपलेली असते.

फेसबुक मुळे प्रत्येक जण स्वताला आपण कोणीतरी आहे असा समजू लागला, सारखे काहीना काही अपलोड करू लागला. हे व्यसन एवढे वाढले की फेसबुक देखील आता सिगरेट सारखी हवा हवासा वाटू लागला आहे. टपरीवर जाऊन सिगरेट ओढणे आणि सारखे सारखे फेसबुक उघडने हे व्यसनच आहे, असे अनेकांना वाटते. बहुदा सध्याची परिस्थिती बघता २०५० साला पर्यंत अप्लोडकर, स्टोरीकर, सेल्फिक्र, फिल्टरनेकर वैगेर नवीन  आडनाव उदयास येऊ शकतात. पण याला काही लोक अपवाद आहेत.अर्ध्या चहाच्या कपात कॉफी ओतून दिल्यासारखे ही मंडळी काम करत असतात. कलेक्टरच होणार होतो पण या देश्याच्या सुख सोयी नादुरुस्त असल्या मुळे इथे काम करतोय असे अविर्भाव असलेले लोक, स्टेट बँक मध्ये कामाची टाळाटाळ करताना खुशाल सापडतात. हे म्हणजे instagram च्या पंचायतीचे जगप्रसिध्द सरपंचाला फेसबुकवर कोणीच ओळखत नाही अशी पंचायत झाली आहे.

आताश्या कळतच नाही चालले आहे ते कश्या'साठी' आहे आणि आपली दुनिया कोणती ही जी काटेरी पण हसवी की मलमली पण फसवी?

----------------------------------------------------------------------

६० पोस्ट पूर्ण.
सर्व वाचकांचे आभार.


Tuesday, 1 May 2018

संधी प्रकाश

व्हायसर खराब झालेल्या नळातून पडणार्या थेंबांनी बादली भरली होती. तेही ठीक आहे, नंतर ते पाणी कुठेतरी वापरता येईल पण रात्री गादीवर पडावं आणि मनाला जी विचारांची गळती लागते ती विचारांची टीप टीप झोप लागू देत नाही. आसपास च्या संपूर्ण शांत वातावरणात तिकडे बाथरूमच्या त्या गळक्या नळातून पाण्याचा थेंब बादलीत पडला की इथे मनात विचारांची पटरी बदलते. मनात असेच वाहत राहणारे विचार किती तरी मिनिटे, तास, अर्धा दिवस, दिवस आणि रात्र आपल्या पासून वाहून नेत असतात पण इथे मात्र आपली आयुष्याची भरलेली बादली रिती होत आहे.

रात्र, मध्य रात्र किंवा पहाट चायला ही लघवी देखील कधीही लागते. नळाची गळती, मनाची गळती आता ही शरीराची गळती, पण या सगळ्यात झोप मात्र त्या संडासात फ्लश होऊन जाते. एवढेच काय तर पाय धुवायला बाथरूम मध्ये जावं तर संध्याकाळी कामावरून आल्यावर कपडे धुवायला पडलेले आहेत. त्या कपड्यांना येणाऱ्या घामट वासाने बाथरूम भरलेलं आहे आणि त्या गलीच्छ कुबट हवे ने भरलेल्या त्या फुग्यातुन बाहेर पडताना परत त्या ऑफिसच्या रटाळ वातावरणात अंघोळ केल्या सारखं वाटत आहे.

नळ घट्ट बंद करता येतो, मनाच्या विचारांची दिशाभूल करून झोप ओढून आणता येते पण शरीर? शरीरीच थकलेलं नसेल तर जरा अवघडच आहे. कॉफी ने भरलेल्या कपाचा कान धरून ओठांना लावायची फार इच्छा आहे पण इतक्या भांड्यान पैकी एक जरी भांड आत्ता इतक्या रात्री माझ्या हातून पडलं तर उद्या आमचं भांडण पक्क आहे. रात्री अपरात्री असे उठून काहीही विचार मनात येत असताना मन मात्र लगेच अजगरा सारखं आपण झोपुयात ना ! असा लडिवाळ हट्ट धरत आहे आणि शरीर इथे झोम्बी सारखं अंधारात चाचपडत चालेलं आहे. मोरी आणि नळाच्या ओटीला लटकणाऱ्या थेंबांची काय वैचारिक देवाणघेवाण चालते कळत नाही पण त्या संवादात फ्रीज देखील स्वताला चालू बंद करत आहे बहुदा मोरी(besin/sink) आणि नळां मध्ये वैचारिक मतभेद होत आहेत असे त्याला वाटले की तो शांत पण ते भेद भेदून टाकत आहे वाटत.

घड्याळाची टिक टिक एकीकडे चालू असते, उशीर झालाय आता झोपून घ्यावं किंवा उद्या उठायला उशीर होईल म्हणून तरी झोपून घ्यावं, असं त्याचं म्हणणं ऐकून न ऐकल्या सारखं करावं. आता टेरेस आहे , हातात कोरी सिगरेट आहे ... डोळ्यात बिलकुल झोप नाहीये आणि विचारांची टाकी? एकदम कोरडी मनात एकही विचार नसतो awkward silence. गार वाऱ्याची झुळूक आपण जिवंत आहोत याची जाणीव करून देते आहे, मग त्या मेलेल्या सिग्रेटीला अग्नी देऊन तिची चिता ओढत बसायची, ती सिगरेट ही चितेतून चिंता मुक्त होताना तुम्हाला काही प्रमाणात मरण निस्वार्थी पणे वाटते ... आकाशाला निसर्गाने रेडियम चे तारे लावलेले रात्री चमकत असतात, मधूनच एखादा रेडियम चा तारा निथळून पडतो. उन्हाळ्यात अगदी बेडरूम मध्ये देखील छताला लावलेले रेडियम चे तारे तुटताना दिसतात दुसर्या दिवशी सकाळी काही काही तर अगदी पायाशी येऊन पडलेले सापडतात, मग दुसर्या दिवशी डिंक, शिडी च्या सहाय्याने तो तारा परत छताला लावून टाकतो. भरतिये ... भरतिये ! मनाची टाकी विचारांनी भरतिये.

रात्रीची वेळच मुळी मजेदार असते, सगळं शांत. चोर पोट भरायला जागे आणि चोराला पकडून स्वताचे पोट भरणारे चोर देखील जागे. हप्ता देऊन पहाटे पर्यंत भुर्जी ची गाडी चालू ठेवणारे किती सुखी राव ... त्यांना सूर्य उगवला, की माझ्या सारखीच झोप देखील येईल अगदी माझ्या सारखीच फरक एवढाच की ते झोपू शकतील तेव्हा मात्र मी स्वप्न साकार करायला बाहेर पडेल. हप्ता देऊन पहाटे पर्यंत झोप घेता आली असती तर किती छान . तो बघ तुटलेला तारा,आकाशाला देखील गळती लागली काय? नाही नाही विमान आहे, जाऊदे ही सिगरेट इथून बोटांनी ढकलू हाच आपला तुटका तारा.

परत शांत डोकं ,मोकळं डॉकं. इमारतींना स्पायडर मेन सारखे चिकटलेले एसी आणि पाईप्स एकमेकांत गप्पा मारत आहेत अधून मधून लिफ्ट त्यांच्या अधे मध्ये करत आहे. शांत, झोपलेले, निद्रिस्त ... पण हट्ट त्या दिवशी ना मी जर बिन्दास्त जाऊन बोललो असतो न तर बर झालं असत यार. उगाच घाबरून बसलो. तसं आज ही तिच्या कडे जाऊ शकत होतो जाऊदे तिला तिची चूक कळेल, एच आर असली तर काय झालं...शाळेत मीच तर लावायचो फिल्डिंग...फक्त शाळेत काय, गल्लीत , कोलेजात ... कोलेजातली ती मधुरा कुठे असते काय माहित? साला त्या काळात मोटार चालवायची यार. पहाटे चे इतके वाजले होते की हौदात पाणी पडायला लागले आहे...काही ऑटोमॅटीक मोटारी देखील चालू झाल्या होत्या त्यांचा आवाज नाही पण कंपन पायाला जाणवत आहे, आता कान जमिनीला लावला तेव्हा मोटारीचा आवाज स्पष्ट येत आहे.  

जुना म्हणजे आता कालचा वर्तमान पत्र मला भूतकाळ वाचायला देत होता मग ,मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉप वैगरे मध्ये काहीच आकर्षक नाही वाटलं, खेळून झाल्यावर आता बायको सोबत खेळायची इच्छा होत होती पण ती गाढ झोपेत माझ्या सोबत असण्याचे स्वप्न पाहत असावी आणि तेव्हा हातात एक पुस्तक धरले जे कान जमिनीला लावल्यावर सोफ्या खाली सापडले होते. आजकालच्या लोकांच्या मनांना पुस्तक वैगरे म्हणजे खेडेगावातल्या लोकांना पाण्याने भरलेल्या टँकर ची गरज असल्या पेक्षा महत्वाचे आहे.
झालं डोकं आता परत विचारांनी तुडुंब भरलय. बरोबर पुस्तक समोर धरलं की मधमाश्या पोळाला चिकटाव्या तसे तसे विचार मनाला अजून चिकटत राहत आहे.  

बाहेर फटफटायला लागलं, याला संधी प्रकाश म्हणतात म्हणे. याच संधी प्रकाशात सर्वात ज्यास्त अपघात होतात रस्त्यावर, पण कोणाचे लक्ष जाते का ? त्या अपघातांवर जे बेडरूम मध्ये घडतात आणि नौ महिन्याने जन्माला येतात, चायला! आपल्यातले किती सुनिश्चित होतो आणि किती अपघाती? काय माहित? शरीर सुखाचा संधी प्रकाशाला वेळ काळ नाही आणि नाहीये त्या रस्त्यावरच्या अपघातांना काही मुहूर्त. फक्त एका अपघातात मृत्यू तर एकात जन्म . वाह ! आज म्हणजे मनाने, weird  विचारांची वेगळीच पातळी गाठली.

सूर्य देखील एका चिडक्या शिपाया सारखा लाल बुंद होऊन त्याच्या कामावर आला होता, ऑफिस मध्ये आल्या आल्या शिपाई लाईट लावतो तसा त्याने सगळं उजळून टाकलं आता कुठे या डोळ्याला त्याचा चंद्र या सूर्यात दिसू लागला या उजेडात त्याला त्याची रात्र सापडू लागली. डॉलर सोडून रुपयात आले की अशी झोपेची किंमत मोजावी लागते. ने जेटलॅग असाच असतो ... 





गंध

प्रत्येकाच्या काही आवडी निवडी असतात, त्या आवडी निवडींना कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा ते 'हट्ट' होऊन बसतात. जी गोष्ट माणसाला एकत्र आ...