लेखक - दुर्गेश विवेक निसळ.
प्रिय,
MH16-2112
कशी आहेस? तुला शेवटचं साईड स्टँड ला उभी केली की मेन स्टँड ला हेही आठवत नाहीये. वारुळात पाणी शिरावं आणि मुंग्या बाहेर पडाव्या तसं लोकांनी पुणं सोडलं. मीही त्यातलाच एक मुंगळा. शेवटचं... हॅण्डल लॉक आहे का तपासण्यासाठी केलेल्या स्पर्शा आधी आपण पुण्याच्या मोकळ्या रस्त्यावर चांगलेच बागडलो... ते मोकळे रस्ते परत मिळणार नाहीत. माझ्याकडे तुझा एक ही फोटो नाही म्हणून वाईट वाटलं पण तू फेसबुक वर देखील कुठे आहेस... त्यामुळे काही वाटेनासं देखील झालं.
तुझी आठवण येते, तुझी काळजी वाटते तुझ्यावर धुळीचा थर जमला असेल... पण आपल्या घरातील पुस्तकांवर आता धूळ राहिलेली नाही,आनंद वाटला ना ऐकून? तुझ्यावर कुत्र, मांजर घाण करत असतील... मी आलो की तुला चका-चक करेल. सध्या रस्त्यावर खूप कमी गाड्या आहेत... बिना परवानगी चालू असलेल्या गाड्या जप्त देखील होत आहेत. त्या पेक्षा आहेस त्या पार्किंग मध्ये सुखी रहा... घरातील आई बाबा दादा आणि त्यांच्या गाड्यांनी तुझी आठवण काढली... सध्या सुटलेले पोट आणि दुखणारे पाय तुझी सतत आठवण काढतात. प्रदूषण कमी झालेलं असलं तरी गच्ची पर्यंत चीच मजल शक्य आहे.
स्वतःची काळजी घे, मी आलो की तू सुरवातीला कुरबुर करशील मला ठाऊक आहे पण मी तुला तुझ्या आवडत्या सर्व्हिस स्टेशन ला घेऊन जाईल, वॉशिंग सेंटर, पेट्रोल पंप ला आपण जाऊ आणि नंतर मग परत एकदा मस्त एका राईडला फक्त तू न मी. लवकरच येतो. पार्किंग मधल्या इतरांशी नीट वाग. सध्या कोणी पेट्रोल चोरी करायला येईल अशी शक्यता कमीच आहे. काळजी घे. ऑइल लिकेज कडे दुर्लक्ष करू नको. आम्हाला ही ओईली खायला मनाई आहे. काळजी घे. तुझी खूप आठवण येते.
तुझाच,
दुर्गेश
(चालक मालक)