व्हायसर खराब
झालेल्या नळातून पडणार्या थेंबांनी बादली भरली होती. तेही ठीक आहे, नंतर ते पाणी
कुठेतरी वापरता येईल पण रात्री गादीवर पडावं आणि मनाला जी विचारांची गळती लागते ती
विचारांची टीप टीप झोप लागू देत नाही. आसपास च्या संपूर्ण शांत वातावरणात तिकडे
बाथरूमच्या त्या गळक्या नळातून पाण्याचा थेंब बादलीत पडला की इथे मनात विचारांची
पटरी बदलते. मनात असेच वाहत राहणारे विचार किती तरी मिनिटे, तास, अर्धा दिवस, दिवस आणि रात्र आपल्या पासून वाहून नेत असतात पण इथे मात्र आपली आयुष्याची भरलेली बादली रिती होत
आहे.
रात्र, मध्य रात्र
किंवा पहाट चायला ही लघवी देखील कधीही लागते. नळाची गळती, मनाची गळती आता ही
शरीराची गळती, पण या सगळ्यात झोप मात्र त्या संडासात फ्लश होऊन जाते. एवढेच काय तर
पाय धुवायला बाथरूम मध्ये जावं तर संध्याकाळी कामावरून आल्यावर कपडे धुवायला
पडलेले आहेत. त्या कपड्यांना येणाऱ्या घामट वासाने बाथरूम भरलेलं आहे आणि त्या
गलीच्छ कुबट हवे ने भरलेल्या त्या फुग्यातुन बाहेर पडताना परत त्या ऑफिसच्या रटाळ
वातावरणात अंघोळ केल्या सारखं वाटत आहे.
नळ घट्ट बंद करता
येतो, मनाच्या विचारांची दिशाभूल करून झोप ओढून आणता येते पण शरीर? शरीरीच थकलेलं
नसेल तर जरा अवघडच आहे. कॉफी ने भरलेल्या कपाचा कान धरून ओठांना लावायची फार इच्छा आहे पण इतक्या भांड्यान पैकी एक जरी भांड आत्ता इतक्या रात्री माझ्या हातून पडलं
तर उद्या आमचं भांडण पक्क आहे. रात्री अपरात्री असे उठून काहीही विचार मनात येत असताना
मन मात्र लगेच अजगरा सारखं आपण झोपुयात ना ! असा लडिवाळ हट्ट धरत आहे आणि शरीर इथे झोम्बी सारखं
अंधारात चाचपडत चालेलं आहे. मोरी आणि नळाच्या ओटीला लटकणाऱ्या थेंबांची काय
वैचारिक देवाणघेवाण चालते कळत नाही पण त्या संवादात फ्रीज देखील स्वताला चालू बंद
करत आहे बहुदा मोरी(besin/sink) आणि नळां मध्ये वैचारिक मतभेद होत आहेत असे त्याला वाटले की तो
शांत पण ते भेद भेदून टाकत आहे वाटत.
घड्याळाची टिक टिक
एकीकडे चालू असते, उशीर झालाय आता झोपून घ्यावं किंवा उद्या उठायला उशीर होईल
म्हणून तरी झोपून घ्यावं, असं त्याचं म्हणणं ऐकून न ऐकल्या सारखं करावं. आता टेरेस
आहे , हातात कोरी सिगरेट आहे ... डोळ्यात बिलकुल झोप नाहीये आणि विचारांची टाकी?
एकदम कोरडी मनात एकही विचार नसतो awkward silence. गार वाऱ्याची झुळूक आपण जिवंत आहोत याची
जाणीव करून देते आहे, मग त्या मेलेल्या सिग्रेटीला अग्नी देऊन तिची चिता ओढत
बसायची, ती सिगरेट ही चितेतून चिंता मुक्त होताना तुम्हाला काही प्रमाणात मरण निस्वार्थी पणे वाटते ... आकाशाला “निसर्गाने” रेडियम चे तारे लावलेले रात्री चमकत असतात, मधूनच एखादा रेडियम चा तारा
निथळून पडतो. उन्हाळ्यात अगदी बेडरूम मध्ये देखील छताला लावलेले रेडियम चे तारे
तुटताना दिसतात दुसर्या दिवशी सकाळी काही काही तर अगदी पायाशी येऊन पडलेले सापडतात, मग दुसर्या दिवशी डिंक, शिडी
च्या सहाय्याने तो तारा परत छताला लावून टाकतो. भरतिये ... भरतिये ! मनाची टाकी
विचारांनी भरतिये.
रात्रीची वेळच मुळी
मजेदार असते, सगळं शांत. चोर पोट भरायला जागे आणि चोराला पकडून स्वताचे पोट भरणारे
चोर देखील जागे. हप्ता देऊन पहाटे पर्यंत भुर्जी ची गाडी चालू ठेवणारे किती सुखी
राव ... त्यांना सूर्य उगवला, की माझ्या सारखीच झोप देखील येईल अगदी माझ्या सारखीच
फरक एवढाच की ते झोपू शकतील तेव्हा मात्र मी स्वप्न साकार करायला बाहेर पडेल.
हप्ता देऊन पहाटे पर्यंत झोप घेता आली असती तर किती छान . तो बघ तुटलेला तारा,आकाशाला देखील गळती लागली काय? नाही नाही विमान आहे, जाऊदे ही सिगरेट इथून बोटांनी ढकलू हाच आपला तुटका तारा.
परत शांत डोकं
,मोकळं डॉकं. इमारतींना स्पायडर मेन सारखे चिकटलेले एसी आणि पाईप्स एकमेकांत गप्पा
मारत आहेत अधून मधून लिफ्ट त्यांच्या अधे मध्ये करत आहे. शांत, झोपलेले, निद्रिस्त
... पण हट्ट त्या दिवशी ना मी जर बिन्दास्त जाऊन बोललो असतो न तर बर झालं असत यार.
उगाच घाबरून बसलो. तसं आज ही तिच्या कडे जाऊ शकत होतो जाऊदे तिला तिची चूक कळेल,
एच आर असली तर काय झालं...शाळेत मीच तर लावायचो फिल्डिंग...फक्त शाळेत काय, गल्लीत
, कोलेजात ... कोलेजातली ती मधुरा कुठे असते काय माहित? साला त्या काळात मोटार
चालवायची यार. पहाटे चे इतके वाजले होते की हौदात पाणी पडायला लागले आहे...काही
ऑटोमॅटीक मोटारी देखील चालू झाल्या होत्या त्यांचा आवाज नाही पण कंपन पायाला जाणवत
आहे, आता कान जमिनीला लावला तेव्हा मोटारीचा आवाज स्पष्ट येत आहे.
जुना म्हणजे आता
कालचा वर्तमान पत्र मला भूतकाळ वाचायला देत होता मग ,मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉप वैगरे
मध्ये काहीच आकर्षक नाही वाटलं, खेळून झाल्यावर आता बायको सोबत खेळायची इच्छा होत
होती पण ती गाढ झोपेत माझ्या सोबत असण्याचे स्वप्न पाहत असावी आणि तेव्हा हातात एक पुस्तक धरले जे कान जमिनीला लावल्यावर सोफ्या खाली सापडले होते.
आजकालच्या लोकांच्या मनांना पुस्तक वैगरे म्हणजे खेडेगावातल्या लोकांना पाण्याने
भरलेल्या टँकर ची गरज असल्या पेक्षा महत्वाचे आहे.
झालं डोकं आता परत
विचारांनी तुडुंब भरलय. बरोबर पुस्तक समोर धरलं की मधमाश्या पोळाला चिकटाव्या तसे
तसे विचार मनाला अजून चिकटत राहत आहे.
बाहेर फटफटायला
लागलं, याला संधी प्रकाश म्हणतात म्हणे. याच संधी प्रकाशात सर्वात ज्यास्त अपघात
होतात रस्त्यावर, पण कोणाचे लक्ष जाते का ? त्या अपघातांवर जे बेडरूम मध्ये घडतात
आणि नौ महिन्याने जन्माला येतात, चायला! आपल्यातले किती सुनिश्चित होतो आणि किती
अपघाती? काय माहित? शरीर सुखाचा संधी प्रकाशाला वेळ काळ नाही आणि नाहीये त्या रस्त्यावरच्या
अपघातांना काही मुहूर्त. फक्त एका अपघातात मृत्यू तर एकात जन्म . वाह ! आज म्हणजे
मनाने, weird विचारांची
वेगळीच पातळी गाठली.
सूर्य देखील एका
चिडक्या शिपाया सारखा लाल बुंद होऊन त्याच्या कामावर आला होता, ऑफिस मध्ये आल्या
आल्या शिपाई लाईट लावतो तसा त्याने सगळं उजळून टाकलं आता कुठे या डोळ्याला त्याचा
चंद्र या सूर्यात दिसू लागला या उजेडात त्याला त्याची रात्र सापडू लागली. डॉलर सोडून रुपयात आले की अशी झोपेची किंमत मोजावी लागते. ने जेटलॅग
असाच असतो ...
Mast
ReplyDeleteThank you
Delete