Monday, 18 May 2020

दृष्टिकोनच बदलला...

दृष्टिकोनच बदलला...

लँडलाईन वाजला की काही ठराविक मंडळीं पैकी कोणीतरी कॉल केला असणार हे लक्ष्यात येत. त्यात कस्टमर केअर, कॉम्पुटराईज कॉल, शेजारी किंवा म्हातारे आजी आजोबा आणि नातेवाईक. खरं तर असे कॉल नेमका  घरातील नको तो व्यक्ती उचलतो. त्यावर त्याला.नाही नाही ते ऐकावे पण लागते.

मागील वर्षी नोव्हेंबर मध्ये लांबच्या नात्यातल्या एकीचा कॉल आलेला. 
' हॅलो... कोण लंबोदर का?' एकदम उत्साहात. 
' हो... आपण कोण?' लंबोदर थोडं बिचकत. 
' विसरलास ना... तुम्हा मुलांना काय आता आठवणार... अरे मी अक्का बोलते आहे...' तिने थोडं खिदळत उत्तर दिलं. त्या हसण्यात आज तू बरा सापडलाय असा आव होता. 
' आई बाबा नाहीत घरी.' या लंबोदर च्या वाक्याला कानाडोळा करून तिने स्वतःच्या बोलण्याचा भडीमार चालू केला. 
' काय करतोय रे सध्या तू?'  बोलण्यात चिकित्सक पणा आणत तिने विचारलं. 

त्याच्या दुखत्या नसे वर बोट ठेवलं गेलं होतं. ओळखीतील अनेकांना माहीत होतं की तो गेट च्या परीक्षेची तयारी करतोय.
' काही नाही... अभ्यास बाकी काही नाही ' त्याने नाराजी चा सुर लपवत उत्तर दिलं. त्यावर अक्काने मात्र हो नाही काहीच न विचारता... तिचा मुलगा गणेश कसा आता विदेशात जाणारे त्याला किती जड पॅकेज मिळणारे. तू पण असच काहीतरी कर, भारतात काय ठेवलं आहे. या सगळ्या नंतर आई बाबांना सांग कॉल केला होता गणेश च सांगायला... काळजी घे. हे तिने आवर्जून सांगितलं.

या सगळ्याला लंबोदर फक्त हो हो तेवढंच बोलू शकत होता... अर्थात हा कॉल झाला हे तो काही घरी सांगणार नव्हता. 

कधीतरी नंतर. अक्का चा परत कॉल येऊन गेला. तेव्हा लंबोदर ने त्यादिवशी काहीच सांगितलं नाही हे उघड झालं. 
' विसरला असेल तो... पण तुमचे अभिनंदन. गणेश ला पण शुभेच्छा.' असं म्हणून लंबोदर ची पाठराखण झाली. 

खरंतर लंबोदर फर्स्ट क्लास मध्ये पास झालेला, गणेश धक्के खात खात... काही छोटे मोठे कोर्सेस करून तिकडे चाललेला. लंबोदर ला आधीपासून शासकीय कामात आवडत. भारतावर अफाट प्रेम पण पद मिळत नाही तो पर्यंत चार चौघात असे आत्मविश्वास कमी करणारे प्रसंग येतातच हे त्याला माहीत होतं. नातेवाईकांनी आपल्या ज्या विषयावर चर्चा केली नाही... ती आपली भक्कम बाजू समजायची. अश्या विचाराचा लंबोदर होता.

दुपारची वेळ. सर्वत्र शांतता. लँडलाईन खणखणला. आई बाबांच्या झोपेचं खोबरं होऊ नये म्हणून त्याने लगोलग उचलला.
' हॅलो... मी अक्का बोलतेय... लंबोदर का?' 
' हो अक्का मीच बोलतोय '. आता हीच काय नवीन? असा विचार त्याच्या मनात आला पण सध्या काळ वेगळा होता... ' काय झालं अक्का सगळं बरंय ना?' त्याने काळजीपूर्वक विचारले. 
' या करोना मूळे गणेश ची काळजी वाटते रे... तिकडचं सरकार काय मदत करणार पोराची? तिथे तर साधं अजून लॉक डाऊन पण नाहीये... तो इथे असता तर काळजी नसती.' ती बरीच व्यथित होती. 
' अक्का काळजी नको करू... मी सांगतो आई बाबांना तुला कॉल करायला...' त्याने जरा उरकत घेण्याच पाहिलं. 
' नाही रे... तुझ्याशीच बोलायला फोन केलेला. बरंय रे तू इथे आहेस. सर्वांची काळजी घेयला. तू आहेस तुझ्या आई बाबांसोबत... माझे तुला अनेक आशीर्वाद. तुला मनासारखी नोकरी आणि पद मिळो. उत्तम देश सेवा कर..' 
आता तिचा आवाज हेलवला होता. 
' thanks अक्का तू गणेश ची काळजी नको करू... कधीही कॉल कर. मी सांगतो आई बाबांना कॉल आलेला.' 

अक्काने यावर उत्तर न देताच कॉल कट केला. 

आरामात बसत. टीवी चा कमी केलेला आवाज परत थोडा वाढवत. चेहेऱ्यावर स्मित घेऊन तो बसला...
 दुपारच्या चहा पिताना ' लँडलाईन वाजला होता ना रे? कोणाचा होता?' आई बाबांनी विचारलं

त्यावर लंबोदर ने हसत उत्तर दिलं ' बदलेल्या दृष्टिकोनाचा'.

- दुर्गेश विवेक निसळ 

6 comments:

गंध

प्रत्येकाच्या काही आवडी निवडी असतात, त्या आवडी निवडींना कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा ते 'हट्ट' होऊन बसतात. जी गोष्ट माणसाला एकत्र आ...