शहरातल्या अश्या भागात छोट्या छोट्या गल्ली-बोळात जिथे काय काय चालतं हे सर्वांना माहीती असतं पण कोणीच त्या कडे लक्ष देत नाही अश्या भागात... फॉर्मल शूज घातलेला भास्कर भरभर चालत होता. मध्येच थांबून चुकलेला रस्ता, योग्य ती दिशा पकडून चालू लागत होता. तिथल्या रहिवाश्यांनी त्याला आधी पाहिलेलं असलं तरीही त्याच्याकडे कोणी आपुलकीने बघत नव्हतं... पत्र्यावर उड्या मारणारी वानरं, भरलेल्या टाकीतून पडणारे पाणी, हापश्यातून उपसले जाणारे पाणी, जोरात वाजणारे बिहारी गाणी, त्यात मिश्रित झालेले मराठी होम मिनिस्टरचं टायटल साँग... सगळा आवाज एक झालेला.
'एक बरंय आवाजाला जाती नाहीत, नाहीतर अवघड झालं असतं', असा मनातच विचार करून तो निघाला. तेवढ्यात स्पोर्ट्स शूज घातलेल्या ३-४ गुंडांनी त्याला गाठलं. त्यातील एकाने त्याला असा मागून धरला की भास्कर कुठेच जाऊ शकत नव्हता...
नाकातून बोलणारा आवाज आला "कुठे निघालास रे..." भास्कर हा आवाज काही पहिल्यांदा ऐकत नव्हता पण प्रथमच त्यानेदेखील नाकातून बोलत... "छमिया ने तुला पाठवलं? अरे अरे काय तुला काही स्टेटस आहे की नाही स्वतःचं?" भास्कर ने त्याला असा प्रश्न विचारायचं कारण हे की तो गुंड बराच मुरब्बी होता. अनेक खून, दरोडे, हाफ मर्डर करून त्याने समाजात दहशत पसरवली होती. तो खूप कमी बोलायचा.
इतर गुंडांना देखील तेच वाटलं की या white collar ला फक्त आणायला या पराक्रमी बाबूंना आपल्या सोबत का पाठवलं असेल पण भास्कर चालाख आहे, हे सर्व इतर गुंडांना माहिती होतं.
"ए स्टेटस ! ते काय नाय... गप भाडखाऊ." त्यांच्यातील एक जण भास्करवर खेकसला.
" ए छमीयाच्या कुत्र्यांनो मला तिच्याकडे घेऊन चला , मी गल्ली विसरलोय. लोकांना पत्ता विचारणार होतो पण म्हटलं येतालच तुम्ही वास घेत न्यायला... बरोबर होतो मी."
"ए हरामी... जीभ कसली चालतीये आज रे तुझी भडव्या... काय पिऊन आला काय तू? हां?..." एक गुंड वास घ्यायला येतो तर भास्कर त्याला पकडलेल्या गुंडावर " ए सोडे... काय पळून चाललो का?" ओरडून कॉलर नीट करत बाजूला उभा राहिला.
"काय बघताय काय कुत्र्यांनो..." भास्कर परत त्यांना डिवचला. या मोहल्ल्यात या गुंडांनी असा अपमान पहिल्यांदाच अनुभवला असेल... आपण जर आत्ता याला धडा शिकवला नाही तर आपल्याला कोणी घाबरणार नाही अशी भीती प्रत्येक गुंडाला असते ती त्यांना देखील होती पण आत्ता काहीच करायचं नाही असे आदेश होते. भास्कर आणि गुंडांमधला तणाव वाढत होता पण... कळत नकळत अनेक नजरा आपल्यावर आहेत असं गुंडांना वाटतच होतं पण मोहल्ल्यातील लोकांना याचं फार काही घेणं देणं नसत.
"चाय गरम चाय" म्हणत एक लुकडा बनियन घातलेला मुलगा येऊन... सर्वांना कडे पाहून "जो झगडे करणे बाजू मे करो. क्या साला लफडा... चाय गरम चाय" म्हणत तो गेला. गुंडांनी त्याला एका थोबाडीत गार केला असता... पण काही हालचाली करण्या आत तो पुढे गेला.
"चल ना बघताय काय? आधी तुम्ही छमिया चे कुत्रे तर होताच आता बघा माझे पण झालात" भास्कर आज कोणत्याच बाबतीत कच खात नव्हता. या उपर त्याने हाथ समोर छातीसमोर घेऊन... जीभ बाहेर काढून कुत्र्यासारखी नक्कल करून सर्वांची चेष्टा केली. तरीही गुंडांनी काहीच केलं नाही पण त्यांचा राग वाढत चालला होता. 'आपल्या अड्ड्यावर गेल्यावर याच्या कडे बघू ' असे इशारे करून ते निघाले.
छमीया म्हणजे under world चं मोठं व्यक्तिमत्व. वयाने ३६-४० च्या आसपास, 'छ्मीया' फक्त तिला तिचा नवराच म्हणतो... तिचं व्यावसायिक नाव 'साहेबा' आणि खरं नाव अजून वेगळंच, पण आज भास्करने हद्दच केली होती. तिला तिच्या लाडाच्या नावाने अनेक वेळा पुकारून... तिच्या लोकांची नाराजी ओढवून घेतली होती. हेच तिच्या नवऱ्याला कळाले तर तो भास्करचा जीव देखील घेईल.
तिच्यासमोर तिचे गुंड अंतरावर उभे होते. टेबलावर भरपूर पैसे आणि भरपूर बंदुका होत्या. अनेकदा या अंधारलेल्या घरात बंदुका चालत तेव्हा छान सोनेरी प्रकाश पडत असे पण त्या नंतर होणारा आरडाओरडा तर्फडणारा प्रकार जीवघेणा असत.
" दार उघड बये दार उघड..." भास्कर भसकन दारातून आत शिरला... तिने त्याच्याकडे पाहून न पाहिल्या सारखं केलं. कारण ती त्याच्याकडे पाठ करुन tik tok video बनवण्यात व्यस्त होती. भास्कर येऊन सरळ सोफ्यावर बसत म्हणाला, " क्या छमिया? आज तरी जलील चौखट पर कोई नहीं?" खोलीत उभ्या सर्वांना हा खवचटपणा आवडला नाही पण साहेबा म्हणतील तेव्हाच त्यांना हात उचलता आला असता.
"साहेबा... हा भेटल्यापासून असाच वागतोय. तुम्ही म्हणत असाल तर त्याचे हात पाय तोडतो आत्ता लगेच." नाकातून बोलणाऱ्या पराक्रमी गुंडाचे बोलणे पूर्ण होऊ पर्यंतच, टेबलावर असलेल्या बंदुका पायाने सरकवत " ए चल हात पाय दाब माझे... आणि काय गं छमिया किती अंधार केलाय... खिडक्या उघडा. तिनी सांजेची वेळ... दिवे लावा लक्ष्मी येते घरी. चहाचं बघ रे गोट्या..." त्यातल्या त्यात एका टकल्या भरदार गुंडाला तो उद्देशून म्हणाला.
आता तर सगळे चेकाळलेच पण साहेबा काही बोलेनाच म्हणून सारे शांत होते. “अरे जा की चहाचं पहा... चायला" भास्कर आळस देत म्हणाला. टकल्या गुंडा ने दातओठ खाल्ले पण काही बोलू शकला नाही आणि चहा आणायला निघून गेला.
अचानक साहेबाने त्याच्याकडे वळून पाहिलं आणि मोबाईल मध्येच डोळे जमवून... " गळ्यात पट्टा घालून नोकरी करणारा, तू आज इतका कसा माजला रे? काय रे ज्यादा शाणा जाला तू? आज कोणाचा हात आला का तुझ्यावर? कुत्र्या?... काल पर्यंत मॅडम मॅडम अन् आज...? माझ्या शोहरला कळलं तर..."
भास्कर देखील बसल्या बसल्या त्याच्या मोबाईल मध्ये पाहत होता आणि तिचं बोलणं होण्याआधीच एकदम म्हणाला " मस्त... व्हिडिओ मस्त... छमिया लिपस्टिक जरा कमी लावत जा गं... मी नोकरी सोडली हां आणि काय कश्या ठिकाणी राहतेस... इतकं कमावते? जरा चांगली जागा घ्यावी... बरं एक काम कर टीव्ही चालुये का? न्युज लाव" हात डोक्यामागे नेत तो आरामात बसला... सगळे हा प्रकार काय चाललाय पहातच बसले. इतर वेळी कोणाची मिजास होती या घरात असे वागण्याची... पण अचानक हे असं काहीतरी घडत होत की कोणालाच काही कळत नव्हतं.
साहेबाने टीव्ही चालू केला. बातम्या लावल्या तर त्यावर
"एका अज्ञात इसमाने बिलाल अजमल सैदला भर रस्त्यात काही मिनिटांपूर्वी जीवे मारलं... बिलाल अजमल सैद हा under world चा मुखिया म्हणून प्रसिद्ध होता." भास्कर झटक्यात उठून तिच्या हातातून रिमोट घेऊन टीव्ही बंद करून परत जागेवर येऊन बसला.
"मीच मारलंय... माझं काही बरं वाईट करायचं करून घ्या" साहेबाला काहीच ऐकू जात नव्हतं. ती थक्क होऊन जागेवरच कोसळली. तिचे गुंड ना तिला सावरायला धावू शकत होते ना त्या भास्करला हात लावू शकत होते. एकंदरीत सगळं काही मंदावलं गेलं.
"चाय गरम... ओ साब. अभी तुमको टीव्हीपे देखा... तुमने खून किया... आजका चाय मेरी तरफ से... आजसे तुम हमारा नया भाई." चहावाला बनियन घातलेला तोच पोरगा आला आणि बरच काही निर्णायक बोलून गेला... आता नवं राज्य सुरू झालंय असा भाव भास्कर च्या चेहर्यावरील हास्यात दिसू लागलं.
"अये छमिया... माझ्यावर कोणाचा हात नाहीये... आता मीच हात आहे." असं बोलून त्याने बंदुका आणि पैश्याचे गठ्ठे खाली पाडले. तिथे एक घोट घेऊन चहाचा कप ठेवला... एक नेलकटर टाईप चाकू ठेवला, त्याला रक्त लागलेलं होतं आणि मग रुबी क्यूबकडे पाहून त्याला बिघडलेले रंग एकसारखे करून सोडवून टेबलावर ठेवलं. अजून एक चहाचा घोट घेऊन, मागे रेलून बसला.
साहेबाने हंबरडा फोडला होता. गल्लीतले लोकं टीव्ही पाहून पाहून घरा कडे बघू, वळू लागली होती.
खोलीतले सारे गुंड त्याच्याकडे बघतच राहिले... एवढसा किरकोळ माणूस आणि असा daring ने वागू शकत होता? अमानुष वागू शकत होता?
तेवढ्यात एका बंदुकीच्या गोळीचा आवाज झाला
टेबलावरील चाकू आणि रुबी क्यूब हादरलं...
.................................................
really interesting... keep it up.
ReplyDelete